भारत सरकार पाकिस्तानशी चर्चा करण्यास तयार आहे, पण पाकिस्तानने आधी दहशतवादाला मदत करणे थांबवावे, अशी भूमिका केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली. मोदींनी पाकिस्तानमध्ये जाऊन संबंध सुधारण्याच्या दिशेने पाऊल उचलले. मात्र, त्यानंतर पाकिस्तानने चर्चेसाठी अपेक्षित वातावरण निर्माण केले नाही, असा आरोपही त्यांनी केला.

राजनाथ सिंह हे मंगळवारी जम्मू – काश्मीरच्या एक दिवसीय दौऱ्यावर होते. त्यांनी राज्यातील वरिष्ठ नागरी, पोलीस आणि संरक्षण दलांच्या अधिकाऱ्यांशी संरक्षणविषयक स्थितीवर चर्चा केली. तसेच राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची देखील त्यांनी भेट घेतली. यानंतर राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. ‘भारत सरकार पाकिस्तानशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. मात्र, दहशतवादी कारवाया आणि चर्चा दोन्ही एकाचवेळी होऊ शकत नाही. पाकिस्तानने आधी दहशतवाद्यांना मदत करणे थांबवावे, असे सिंह यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: पाकिस्तानमध्ये गेले. तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत संबंध सुधारण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, यानंतर पाकिस्तानने चर्चेसाठी सकारात्मक वातावरणाची निर्मितीच केली नाही, असा आरोप सिंह यांनी केला. गेल्या काही महिन्यात जम्मू- काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा झाली असून राज्यातील दगडफेकीच्या घटना कमी झाल्या आहेत. दहशतवाद्यांची भरती प्रक्रिया थंडावली आहे, असा दावाही त्यांनी केला.