देशातील करोना संसर्गाचा वेग काहीसा वाढल्याचे दिसत आहे. शिवाय, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडतच आहे. मागील २४ तासांत देशभरात ३१ हजार ११८ नवे करोनाबाधित आढळले असून, ४८२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ९४ लाख ६२ हजार ८१० वर पोहचली आहे.
सध्या देशभरात ४ लाख ३५ गहजार ६०३ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ३७ हजार ६२१ वर पोहचली आहे.

एकीकडे नवीन करोनाबाधित आढळत असताना दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याने, ही काहीसी दिलासादायक बाब म्हणावी लागेल. कारण, मागील २४ तासांमध्ये ४१ हजार ९८५ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्यांची देशभरातील एकूण संख्या ८८ लाख ८९ हजार ५८५ वर पोहचली आहे.

देशातील करोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. करोनासंबंधी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने बोलावलेली ही दुसरी बैठक आहे. भारतात ९४ लाखांहून अधिक लोकांना करोना महामारीचा फटका बसला आहे.

करोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

या बैठकीला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित असतील. संसदीय कार्यमंत्रालयाने बैठकीसंबंधी सभागृह नेत्यांशी संपर्क साधला आहे.करोना रुग्णसंख्येच्या बातमीत भारत अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे सर्वात कमी मृत्यू झालेल्या देशांमध्ये भारताचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.