राष्ट्रपतींकडून कौतुक; महिला लोकप्रतिनिधींच्या परिषदेचे दिल्लीत उद्घाटन

महिला लोकप्रतिनिधींच्या पहिल्यावहिल्या राष्ट्रीय परिषदेत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारताच मोदी यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ, अशी घोषणा दिल्याबद्दल मुखर्जी यांनी मोदी यांचे कौतुक केले. मोदी जे बोलतात ते करतात, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

या परिषदेत मोदी यांचे भाषण होणार नसले तरी त्यांनी परिषदेला हजर राहून या प्रश्नावर आपली बांधीलकी असल्याचे अधोरेखित केले असेही राष्ट्रपती म्हणाले.वैधानिक क्षेत्रात महिलांना पुरेसे प्रतिनिधित्वच देण्यात आले नाही तर त्यांचे सक्षमीकरण कसे होणार, असा सवाल  मुखर्जी यांनी शनिवारी येथे केला. संसद आणि राज्य विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या घटनादुरुस्ती विधेयकाचे पुनरुज्जीवन केले पाहिजे, अशी ठाम भूमिकाही या वेळी मुखर्जी यांनी घेतली.

संसदेतील लोकप्रतिनिधींच्या संख्येचा विचार करता महिलांना १२ टक्क्यांपेक्षा अधिक प्रतिनिधित्व देता येऊ शकलेले नाही, हे आपल्यासाठी क्लेशदायक आहे. पुरेसे प्रतिनिधित्वच दिले नाही तर महिलांचे सक्षमीकरण कसे होणार, त्यामुळे दृष्टिकोनात बदल होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

‘राष्ट्रउभारणीत महिला लोकप्रतिनिधींची भूमिका’ या विषयावर लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी परिषद आयोजित केली होती.  यूपीए सरकारने महिला आरक्षण विधेयकाबाबत केलेल्या प्रयत्नांची माहिती देताना मुखर्जी म्हणाले की, हे विधेयक लोकसभेत दोन तृतीयांश मताधिक्याने मंजूर झाले असले तरी राज्यसभेने ते  मंजूर केलेले नाही. जोपर्यंत आरक्षण लागू केले जात नाही तोपर्यंत  महिलांना उमेदवारीची अपेक्षा अवाजवी ठरेल, असेही ते म्हणाले.