उत्तर प्रदेशात रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे एका गर्भवती महिलेची कॉरिडोअरमध्येच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने जागा उपलब्ध नसल्याचं सांगत दाखल करुन घेण्यास नकार दिला होता. यामुळेच महिलेवर कॉरिडोअरमध्ये प्रसूती करण्याची वेळ आली. राम मनोहर लोहिया रुग्णालयात ही घटना घडली आहे. फारुखबाद येथे सर्व सुविधा असणारं हे एकमेव हॉस्पिटल आहे.

धक्कादायक बाब म्हणजे यावेळी महिलेला मदत करण्याऐवजी उपस्थित लोक फक्त पाहत उभे होते. यावेळी काहीजणांनी ही घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद करत व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ स्थानिक पत्रकारांसोबत शेअर करण्यात आला असून महिला जमिनीवर झोपली असल्याचं दिसत आहे. यावेळी आजुबाजूला सगळीकडे रक्त पसरलेलं होतं. तर नुकतंच जन्मलेलं बाळ कॉरिडोअरच्या एका बाजूला कोपऱ्यात कापडात गुंडाळलेलं दिसत आहे.

काही वेळाने महिलेसोबत आलेली एक महिला बाळाला उचलून घेते. मिळालेल्या माहितीनुसार, बाळाला जन्म दिल्यानंतर काही वेळाने महिलेला डॉक्टर प्रसुतीगृहात घेऊन जातात. याप्रकरणाची दखल घेण्यात आली असून जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

“मी याप्रकरणाची दखल घेतली असून चौकशीचा आदेश दिला आहे. आम्ही सत्यता काय आहे हे पडताळण्याचा प्रयत्न करु. जर कोणी दोषी आढळलं तर कडक कारवाई करु”, अशी माहिती जिल्हा दंडाधिकारी मोनिका राणी यांनी दिली आहे.