भारतीय बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून विदेशात पळून गेलेला मद्य व्यापारी विजय मल्ल्याने खळबळजनक दावा केला आहे. भारत सोडण्यापूर्वी आपण अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेतली होती, असे मल्ल्या याने म्हटले आहे. अरुण जेटली यांनी मल्ल्याचा दावा फेटाळून लावला असून भाजपा मंत्र्यांनीही त्यांची पाठराखण करण्यास सुरुवात केली आहे. जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, तोपर्यंत विजय मल्ल्याला सोडलं जाणार नाही असं केंद्रीय पेट्रोलिअम मंत्री धर्मेंद्र प्रधान बोलले आहेत.

‘विजय मल्ल्याने संसदेत अरुण जेटलींच्या उपस्थितीचा फायदा घेतला. मल्ल्या खोटं बोलत असून हे गैरवर्तन आहे. अशा प्रकारच्या अविश्वसनीय व्यक्तीवर आणि त्याच्या बोलण्यावर जे लोक विश्वास ठेवत आहेत, यावरुन त्यांच्यातील मैत्री समोर येत आहे’, असं धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले आहेत की, ‘कोण गोव्याला पार्टीसाठी जायचं ? परदेशात त्याचे पाहुणे म्हणून काय जायचं ? याचा शोध घेतला पाहिजे. ज्यांना मल्ल्यापासून फायदा मिळाला आहे त्यांची माहिती मिळवली पाहिजे’. ‘जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी मल्ल्याला सोडणार नाही. मग तो कितीही मोठा व्यक्ती असो. त्याला परत आणणारच’, असा विश्वास धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला आहे.