पाऊस आणि इतर नैसर्गिक संकटाबद्दल भारतीय हवामान विभाग अंदाज व्यक्त करतो. त्याचबरोबर धोकादायक संकट असेल, तर आधीच सूचना करून प्रशासनाला सावध करण्याच काम करतो. मात्र, पावसाच्या अंदाजावरून अनेक वेळा हवामान विभागावर विनोदही केले जातात. मात्र, अम्फान चक्रीवादळाबद्दल भारतीय हवामान विभागानं व्यक्त केलेल्या अंदाजानं जागतिक हवामान संघटनाही प्रभावित झाली आहे. याबद्दल भारतीय हवामान विभागाचं संघटनेनं कौतुक केलं आहे.

बंगालच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अम्फान चक्रीवादळ निर्माण झालं होतं. या चक्रीवादळाचा पश्चिम बंगाल आणि ओडिशा या दोन राज्यांना फटका बसला. या चक्रीवादळाची तीव्रता आणि त्यांच्याविषयी इतर बाबींचे निरीक्षण नोंदवत भारतीय हवामान विभागानं आधीच दोन्ही राज्यांना सावध राहण्याचा इशारा दिला होता. हे चक्रीवादळ २० मे रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिशात धडकले होते. भारतीय हवामान विभागानं व्यक्त केलेल्या अचूक अंदाजामुळे मालमत्तेचं नुकसान झालं असलं, तरी मोठ्या प्रमाणात जीवित हानी टळली. कारण दोन्ही राज्यांनी चक्रीवादळ येण्या आधीच फटका बसणाऱ्या भागातून लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं.

अम्फान चक्रीवादळाबद्दल व्यक्त केलेल्या अचूक अंदाजाची जागतिक हवामान संघटनेनंही दखल घेतली आहे. संघटनेनं भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहापात्रा यांच्या नावानं पत्र पाठवलं आहे. २ जून रोजी हे पत्र पाठवण्यात आलं आहे. यात जागतिक हवामान संघटनेचे महासचिव ई. मॅनएन्कोवा यांनी संघटनेला दिलेल्या अचूक माहितीबद्दल कौतुक केलं आहे. या चक्रीवादळाचा फटका काही प्रमाणात बांगलादेशलाही बसला. मात्र, भारताने बांगलादेशलाही चक्रीवादळाबद्दल खरबदारी घेण्याचा आधीच इशारा दिला होता.

“भारतीय हवामान विभाग आणि विशेष प्रादेशिक हवामान केंद्रानं तीन दिवसांपेक्षा जास्त कालावधीच्या चक्रीवादळाबद्दल अचूक अंदाज व्यक्त केला. वादळाची उत्पत्ती, त्याचा मार्ग, त्याची तीव्रता, जमिनीला स्पर्श करण्याचं ठिकाण व वेळ हे सगळं अचूकपणे सांगितलं. त्याचबरोबर हवामान, पाऊस आणि वाऱ्याचा वेग यांचा अंदाज याबद्दलही तातडीनं प्रतिसाद देत मदत केली,” असं जागतिक हवामान संघटनेनं आपल्या पत्रात म्हटलं आहे.