चालू वर्षअखेरीस जगात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ३ अब्ज होईल व त्यात दोन तृतीयांश लोक विकसनशील देशातील असतील त्याचबरोबर मोबाईल सेवा ७ अब्ज लोकांपर्यंत जाईल असे संयुक्त राष्ट्रांच्या एका नवीन अहवालात म्हटले आहे.  
इंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन युनियन या संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेने म्हटले आहे की, २०१४ अखेरीस जगातील ४४ टक्के लोकांपर्यंत इंटरनेट सेवा पोहोचेल. विकसनशील देशातील ३१ टक्के घरात इंटरनेट जाईल तर विकसित देशात ७८ टक्के घरात इंटरनेट सेवा पोहोचेल. विकसित देशात घरी इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या प्रमाणात आता फार वाढ अपेक्षित नाही कारण ती आधीच जास्त आहे. मोबाईल सेवा २०१४ पर्यंत ७ अब्ज लोकांपर्यंत जाईल तर आशिया-पॅसिफिक भागात ती ३.६ अब्ज लोकांपर्यंत पोहोचेल. विकनशील देशात मोबाईल कनेक्शनची संख्या वाढेल ती जगाच्या मोबाईल कनेक्शनच्या ७८ टक्के असेल. संस्थेचे महासचिव हमादून टोर यांनी सांगितले की, माहिती व तंत्रज्ञानात संदेशवहन तंत्रज्ञानाचे स्थान मोठे आहे हे परत सिद्ध झाले आहे. संदेशवहन विभागाचे ब्राहिमा सनाऊ यांनी सांगितले की, माहिती तंत्रज्ञानाकडे लोकांचा ओढा आहे हे स्पष्ट होत आहे कारण त्यामुळे लोकांचे जीवनमान सुधारले आहे. माहितीधिष्ठित समाज नेमका किती आहे याच्या आधारे आपण प्रगती मोजू शकतो. २०१४ च्या अखेरीस इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ३ अब्ज राहील व ती जगाच्या लोकसंख्येच्या ४० टक्के राहील. त्यातील दोन तृतीयांश लोक विकसनशील देशातील असतील. आफ्रिकेतील एक पंचमांश, अमेरिकेत दोन तृतीयांश लोक ऑनलाईन होतील. युरोपात इंटरनेटचा वापर  करणाऱ्यांचे प्रमाण ७५ टक्के आहे. मोबाईल ब्रॉडबँडमध्ये जगात वापरकर्त्यांची संख्या २.३ अब्ज राहील विकसनशील देशात हे प्रमाण ५५ टक्के अपेक्षित आहे. गेल्या पाच वर्षांत टेलिफोन वापरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. २००९ पेक्षा टेलिफोन वापरणाऱ्यांचे प्रमाण १० कोटींनी कमी झाले आहे.