गेल्या महिन्यात स्टॅचू ऑफ युनिटीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. अमेरिकेतील प्रख्यात स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यापेक्षा दुप्पट उंचीचा सरदार पटेल यांचा हा पुतळा नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणाजवळील साधू बेटावर उभारण्यात आला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारतीय राजकारणातील योगदान लक्षात घेऊन या पुतळयाला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ असे नाव देण्यात आले आहे. जगातील हा सर्वात उंच पुतळा थेट अंतराळातून दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. उपग्रहांच्या माध्यमातून घेतलेल्या छायाचित्रातून ही बाब समोर आली आहे. ऑब्लिक्यू स्कायसॅट (Oblique Sky Sat) ने १५ नोव्हेंबर रोजी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चा हा फोटो शेअर केला.

 

सोशल मीडियावर सध्या हा फोटो व्हायरल होत आहे. नेटीझन्स यावर आपली मते व्यक्त करत आहेत. त्यांच्या ट्विटवरून समाधान आणि आनंद दिसून येत आहे.

Incredible India https://t.co/xxghr1tHYE

— Stranger (@amarDgreat) November 17, 2018

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. हा पुतळा साकारण्यासाठी सुमारे २ हजार ३८९ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. चीनमधील गौतम बुद्धांचा पुतळा (१५३ मीटर उंच) आणि न्यूयॉर्क शहरातील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी (९३ मीटर उंच) यापेक्षा हा पुतळा उंच आहे. सरदार पटेल यांचे स्मारक असलेले ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ला भेट देण्यास दररोज किमान १५,००० पर्यटक येतील अशी अपेक्षा आहे. या स्मारकामुळे गुजरातमधील पर्यटन व्यवसाय आणि रोजगार वाढेल अशी राज्य सरकारला अपेक्षा आहे.