येमेनमध्ये सौदी अरेबियाने हल्ले सुरूच ठेवले असून भारतीय नौदलाच्या एका जहाजाने ३५० भारतीयांना सोडवले असून ते दिजबौतीला पोहोचले आहेत. त्यांना आता भारतीय हवाई दलाच्या विमानाने मायदेशी आणले जाईल, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले.
परराष्ट्र राज्य मंत्री व्ही.के.सिंह यांनी सांगितले की, आपण दिजबौतीला लवकरच पोहोचत असून येमेनमधील चार हजार भारतीयांना सोडवण्यासाठीच्या मोहिमेवर लक्ष ठेवणार आहोत.
भारतीय नौदलाने भारतीय नागरिकांची अ‍ॅडेन येथून सुटका केली असून एक विमान कोचीत व एक विमान मुंबईत सायंकाळी उतरेल असे स्वराज यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
३५० जणांची सुटका करण्यात आली असून त्यात २०६ केरळी, ४० तामिळी, ३१ महाराष्ट्रीय, २३ बंगाली व २२ दिल्लीचे लोक आहेत असे परराष्ट्र प्रवक्तयाने सांगितले. आयएनएस सुमित्रा या नौदलाच्या जहाजाने भारतीयांची सुटका केली असून आयएनएस मुंबई व आयएनएस तरकश ही नौदलाची जहाजेही तेथे गेली आहेत. ऑपरेशन राहत या मोहिमेत भारतीयांची सोडवणूक करण्यात आली. कवाराती व कोरल्स ही दोन जहाजे तेथे पाठवण्यात आली असून त्यांना चाच्यांपासून संरक्षण देण्यासाठी नौदलाची जहाजे तिथे गेली आहेत. अजूनही नौदलाची दोन जहाजे असून ती भारतीयांची सुटका करण्यासाठी तेथे नांगर टाकून आहेत. सुटका केलेल्या भारतीयांना हवाई दलाच्या सी १७ ग्लोबमास्टर्स विमानांनी भारतात आणण्यात येत आहे.