सहा आठवडय़ांहून अधिक काळ हवाई हल्ले सुरू ठेवल्यानंतर सौदी अरेबियाने दिलेला युद्धबंदीचा प्रस्ताव आपण मान्य केला आहे, असे येमेनचा मोठा भाग बळकावण्यासाठी शिया बंडखोरांची मदत करणाऱ्या राजद्रोही येमेनी सैनिकांनी रविवारी सांगितले.
राजद्रोही सैनिक आणि बंडखोर यांच्यात युती घडवून आणण्याचा आरोप असलेले सत्ताच्युत अध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह यांच्या सनामधील निवासस्थानावर सौदी लढाऊ विमानांनी हल्ला केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.
हद्दपार झालेले अध्यक्ष अबेद्राबो मन्सूर हादी यांच्या समर्थनार्थ सुरू केलेले विनाशकारी हवाई हल्ले मंगळवारपासून पाच दिवस थांबवण्याचा सौदी अरेबियाने दिलेला प्रस्ताव आपणही मान्य केला आहे काय, याबाबत हुथी बंडखोरांनी मात्र काहीही सांगितलेले नाही. या हवाई बाँबहल्ल्यांमध्ये अनेक नागरिक मृत्युमुखी पडत असल्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाने वाढती चिंता व्यक्त केल्यानंतर सौदी अरेबियाने युद्धविरामाचा हा प्रस्ताव दिला आहे.