ठाण्यातील एक तरुण आयसिसमध्ये सामील झाला आहे. २८ वर्षीय तबरेज काही दिवसांपूर्वी नोकरीचे कारण सांगून घराबाहेर पडला. सौदी अरेबियामध्ये नोकरीसाठी जात असल्याची माहिती तबरेजने त्याच्या कुटुंबियांना दिली होती. त्यानंतर त्याने आयसिसमध्ये सहभागी होत असल्याचे फोनवरुन कुटुंबियांना सांगितले. यानंतर त्याच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येतो आहे.

गुरुवारी रात्री उशीरा हे प्रकरण समोर आले. तबरेज ठाण्यातील मुंब्र्याचा रहिवासी आहे. गुरुवारी तबरेजच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ‘दोन दिवसांपूर्वी तबरेजने नोकरीसाठी सौदी अरेबियाला जात असल्याचे सांगितले. यानंतर तिथे पोहोचल्यानंतर त्याने फोन करुन दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचे त्याच्या कुटुंबियांना सांगितले,’ अशी माहिती ठाणे दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली आहे.
.

तबरेजच्या दोनवेळा महाराष्ट्रातील तरुण आयसिसमध्ये सामील होण्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी कल्याणमधील अरीब माजीद, फाहद शेख, अमान तांडेल आणि सहीम टांकी हे चार तरुण इराकमध्ये गेले होते. हे तरुण आयसिसमध्ये सामील झाले. या चार तरुणांपैकी आरीब भारतात परतला. सध्या आरीब तुरुंगात असून सहीम टांकी आणि अमान तांडेल आयसिसकडून लढताना मारले गेल्याची माहिती समोर आली होती.

गेल्या वर्षी ऑक्टोबर-डिसेंबर महिन्यात मुंबईतील मालवणी भागात राहणारे चार तरुण बेपत्ता झाले होते. यातील अयाझ मोहम्मद नावाचा तरुण आयसिसमध्ये सहभागी झाला. मोहसीन शेख नावाच्या तरुणाने अयाझसाठी विमान तिकीट आरक्षित केल्याचा संशय एनआयएनला आहे. याशिवाय मोहसीन समाज माध्यमांचा वापर करुन तरुणांना आयसिसमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यायचा. दिल्ली पोलिसांनी जानेवारीमध्ये मोहसीनला ताब्यात घेतले. मोहसीन सोबतच उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या रिझवान अहमदचे नावदेखील एनआयएच्या आरोपपत्रात आहे. याप्रकरणी एनआयएने २२८ जणांच्या साक्षी नोंदवल्या आहेत.