नवी दिल्ली : गेल्या दीड वर्षात आमच्या सरकारने सुमारे १० लाख तरुणांना कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत आणि हा एक विक्रम आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. केंद्र सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांना दृरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. या रोजगार मेळाव्यात ७१ हजारहून अधिक लोकांना नियुक्तीपत्र देण्यात आले. दरम्यान, यापूर्वीच्या कोणत्याही सरकारच्या कार्यकाळात अशा पद्धतीने नोकऱ्या दिल्या गेल्या नाहीत, असा ठाम दावाही मोदी यांनी या वेळी केला.

सध्याचे युवक हे केंद्र सरकारच्या धोरणे आणि कार्यक्रमांच्या केंद्रस्थानी आहेत. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेमुळे भरती प्रक्रियेला चालना मिळाली आहे. ‘रोजगार मेळावे’ (भरती मोहीम) तरुणांना सक्षम बनवून त्यांच्या क्षमतांना चालना देतात. भारतातील युवक आज आत्मविश्वासाने भरलेला आहे आणि तो प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होत आहे, असे मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले की, ‘भारतीय युवकांच्या क्षमता आणि कौशल्याचा जास्तीत जास्त वापर करणे हे सरकारचे प्राधान्य आहे आणि ते अनेक योजनांच्या केंद्रस्थानी आहेत, मग ते ‘स्टार्ट-अप इंडिया’ असो, ‘डिजिटल इंडिया’ असो किंवा अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रातील सुधारणा असो.’ राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून तरुणांच्या विकासासाठी पावले उचलली जात आहेत, तसेच मातृभाषेच्या वापरावर भर दिला जात असल्याचे मोदी यांनी नमूद केले. भरती परीक्षांमध्ये युवकांना भाषेचा अडथळा येऊ नये म्हणून १३ भारतीय भाषांचा समावेश करण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले.

हेही वाचा >>> वाढलेल्या वनक्षेत्राबाबत आकडे फुगवलेले; ‘भारत वनस्थिती अहवाला’वर तज्ज्ञांची टीका

माजी पंतप्रधान चरण सिंग यांची जयंती सोमवारी साजरी करण्यात आली. चरण सिंग ग्रामीण भारताच्या विकासासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी उभे होते, हे लक्षात घेऊन आमच्या सरकारने खेड्यापाड्यात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून त्याचे पालन केल्याचे मोदी म्हणाले.

महिलांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास

नोकरभरतीत महिलांचा सहभागही लक्षणीय आहे, महिलांनी प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी व्हावे हा सरकारचा प्रयत्न आहे. महिलांना २६ आठवड्यांची प्रसूती रजा मंजूर करण्याच्या निर्णयामुळे त्यांना खूप मदत झाली. ‘पीएम आवास योजने’अंतर्गत बांधलेल्या घरांच्या बहुसंख्य मालक महिला असल्याचे मोदी यांनी या वेळी अधोरेखित केले. देशात महिलांच्या नेतृत्वाखाली विकास होत आहे, असे ते म्हणाले.

ओबीसी भरतीत १७ टक्के वाढ

रोजगार मेळाव्यात (७१ हजारहून अधिक) भरती झालेल्यांमध्ये २९ टक्क्यांहून अधिक इतर मागासवर्गीय प्रवर्गातील (ओबीसी) उमेदवार आहेत. काँग्रेसच्या १० वर्षांच्या सत्तेच्या तुलनेत मोदी सरकारच्या काळात इतर मागासवर्गीय उमेदवारांच्या भरतीत १७ टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी या वेळी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशाचा विकास युवकांच्या कठोर परिश्रम, क्षमता आणि नेतृत्वावर अवलंबून असतो. भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्यासाठी वचनबद्ध आहे. कारण देशाची धोरणे आणि निर्णय आपल्या प्रतिभावान युवकांना सक्षम बनविण्यावर केंद्रित आहेत. नरेंद्र मोदी, पंतप्रधान