काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर आतापर्यंत काश्मीरमध्ये १०० पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली आहे. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या असल्या तरी परिस्थिती सामान्य आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. खोऱ्यातील शांततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे या १०० जणांना अटक करण्यात आली. त्यामध्ये राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
जम्मू-काश्मीरचे दोन भागांमध्ये विभाजन करणारे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले आहे. यापुढे जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश असणार आहेत. श्रीनगरमध्ये काही दुकाने उघडण्यात आली. निर्बंध असले तरी रस्त्यावर लोकांची वर्दळ दिसत आहे अशी माहिती जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या असल्या तरी लोकांनी दुचाकी आणि कार बाहेर काढल्या.
काश्मीरमध्ये लोकांनी दुकाने उघडल्याचे, रस्त्यावर वर्दळ सुरु झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भारत-पाक सीमेवरील कुपवाडा जिल्ह्यातील लोकांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये कलम ३७० रद्द केल्याचा आनंद असून काश्मीर खोऱ्यात शांतता हवी आहे असे लोक व्हिडिओमध्ये बोलताना दिसतात.
पूँछ जिल्ह्यात एका ठिकाणी सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलन सुरु असताना दगडफेकीची घटना घडली. यामध्ये एक पोलीस अधिकारी किरकोळ जखमी झाला आहे. जम्मूमधल्या सर्व भागांमध्ये निर्बंध लागू आहेत. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत. कलम ३७० रद्द करण्याविरोधात कारगिलमध्येही आंदोलन झाले. त्यामुळे तिथेही बंद आहे.