Egg Heist in US: जगाची महासत्ता म्हणून बिरुदावली मिरवणाऱ्या अमेरिकेत सध्या अंड्याचा तुटवडा जाणवतोय. अमेरिकेत अंड्याचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे पेनसिल्वेनिया येथील एका दुकानातून १ लाख अंडी चोरीला गेली आहेत. या अंड्याची किंमत ४० हजार डॉलर्स म्हणजेच ३५ लाखांपर्यंत असल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतर जगभरात हा विषय चर्चेला आला असून पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. फॉक्स न्यूजने दिलेल्या बातमीनुसार ग्रीनकॅसल येथील पेट अँड गॅरी ऑरगॅनिक्समधून १ फेब्रुवारी रोजी ही चोरी झाली होती.

पोलिसांनी सांगितले की, पेनसिल्वेनिया येथील दुकानाच्या बाहेर अंडी भरलेला एक ट्रक उभा होता. हा संपूर्ण ट्रकच चोरीला गेला. अमेरिकेत बर्ड फ्लूची साथ वाढल्यामुळे अंड्याची कमतरता भासू लागली आहे. ज्यामुळे अंड्याचे दर गगनाला भिडले आहेत. बीबीसीने दिलेल्या बातमीनुसार अमेरिकेतील वॅफल हाऊस या अंडी विक्रेता साखळीने नुकतेच अंड्याचे दर वाढवले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावेळी अंड्याचे दर तब्बल ६५ टक्क्यांनी वाढले आहेत. तर कृषी विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार अंड्याचे दर आणखी २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

अमेरिकेत बर्ड फ्लूचा धोका का वाढला?

अमेरिकेत २०२२ पासून एव्हिएन फ्लू अस्तित्वात आहे. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्याचा संसर्ग वाढू लागला. जो अजूनही ओसरलेला नाही. अमेरिकेच्या कृषी विभागाने सांगितले की, जानेवारी महिन्यापर्यंत अंडी देणाऱ्या १४.७ दशलक्ष कोबंड्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाला. २०२३ पेक्षाही ही संख्या कितीतरी पटीने अधिक आहे. अंड्याच्या दरांचे निरीक्षण करणाऱ्या एक्सपाना या संस्थेने सांगितले की, मागच्या काही महिन्यात अंडी देणाऱ्या लाखो कोंबड्यांचा मृत्यू झाला. ज्यामुळे अंड्याची मागणी आणि पुरवठा यात ताळमेळ साधता येत नाही. या कारणामुळे सध्यातरी अंड्याचे दर नियंत्रणात आणता येतील, असे वाटत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्लुमबर्गच्या अहवालानुसार, अमेरिकेत काही शहरात एक डझन अंड्यांची किंमत ७ डॉलरपर्यंत पोहोचली आहे. दोन वर्षांपूर्वीपेक्षा ही वाढ सात पटींनी अधिक असल्याचे म्हटले जाते. तसेच करोना महामारीच्यावेळी लोकांनी ज्याप्रकारे जीवनावश्यक वस्तू विकत घेण्यासाठी दुकानात एकाचवेळी गर्दी केली होती, त्याप्रमाणे बर्ड फ्लूची बातमी आल्यानंतर लोकांनी दुकानातून मोठ्या प्रमाणात अंड्यांची आगाऊ खरेदी केली. याहीमुळे अंड्यांचा तुटवडा भासत असल्याचे सांगितले जाते.