महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार पाडल्यानंतर आता मध्य प्रदेशमध्येही ऑपरेशन लोटस होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले असून कमलनाथ यांनी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्यासह १२ विद्यमान आमदार आणि माजी आमदार पक्षप्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. कमलनात आणि त्यांचा मुलगा नकुल नाथ हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर आता मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसला खिंडार पडते की का? अशी चर्चा आहे. कमलनाथ यांचा नुकताच विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यांचा मुलगा नकुल नाथ हा छिंदवाडा लोकसभेचा खासदार आहे.
माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपाच्या वाटेवर? मुलाकडून काँग्रेस सोडण्याचे संकेत?
कमलनाथ यांनी काय स्पष्टीकरण दिले?
कमलनाथ यांनी माध्यमांशी बोलत असताना भाजपात प्रवेश करणार का? या प्रश्नावर उत्तर दिले. कमलनाथ म्हणाले की, पक्षबदलाचा माझा काही विचार असेल तर त्याची माहिती मी सर्वप्रथम माध्यमांना देईन. कमलनाथ यांनी भाजपा प्रवेशाची शक्यता थेट नाकारली नाही. कमलनाथ म्हणाले, “शक्यता नाकारण्याचा प्रश्नच नाही. माध्यमांचे प्रतिनिधी उत्साहित होत आहेत. मी मात्र उत्साहित झालेलो नाही. मात्र माझा पक्षबदलाचा काही विचार असेल तर मी तशी माहिती देईल,” असे कमलनाथ यांनी स्पष्ट केले.
कमलनाथ आणि नकुलनाथ काँग्रेसवर नाराज असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. अशातच नकुलनाथ यांनी त्यांच्या सर्व समाजमाध्यमांवरील प्रोफाईलवरून काँग्रेससंबंधीची माहिती हटवली आहे. त्यांच्यासह आमदार सज्जन सिंह वर्मा यांनीही सोशल मीडिया हँडलवरून काँग्रेस पक्षाचा लोगो आणि इतर माहिती हटविली आहे. या कृतीतून नकुलनाथ यांनी काँग्रेसला रामराम करणार असल्याचे संकेत दिले असल्याची चर्चा होत आहे.
भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर कमलनाथ यांनी सोडले मौन; म्हणाले, “माझा…”
दरम्यान काँग्रेसचे राज्यातील आणखी एक मोठे नेते दिग्विजय सिंह यांनी या विषयावर बोलताना सांगितले की, मी शुक्रवारी रात्री कमलनाथ यांच्याशी बोललो आहे. त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याची आणि भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता फेटाळून लावली. “ज्या व्यक्तीने नेहरु-गांधी परिवाराच्या खांद्याला खांदा लावून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. असा व्यक्ती काँग्रेस आणि गांधी कुटुंबाला सोडून जावू शकतो का?” असा उलट प्रश्न दिग्विजय सिंह यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना विचारला.
राज्यसभा मिळाली नाही म्हणून नाराज
विधानसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. या पराभवानंतर राज्यसभेची उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा कमलनाथ यांना होती. मात्र तसे झाले नाही. राहुल गांधी यांनीदेखील कमलनाथ यांना उमेदवारी देण्यास विरोध केल्याचा दावा केला जातोय. या सर्व कारणांमुळे कमलनाथ हे नाराज असल्याचे म्हटले जात आहे.