13 year old Afghan Boy Lands in delhi by hiding in Planes landing gear : दिल्ली विमानतळावर एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक १३ वर्षांचा मुलगा लँडिंग गियरमध्ये बसून दिल्लीला पोहचल्याचे समोर आले आहे. हा मुलगा काबुलहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानाच्या लँडिंग गियरमध्ये लपून बसला होता. दिल्ली येथे पोहचल्यानंतर जेव्हा विमानाची तपासणी झाली तेव्हा या मुलाबद्दल माहिती समजली. ही घटना उजेडात आल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काबुलवरून दिल्लीला आलेल्या KAM विमान कंपनीच्या फ्लाइट क्रमांक RQ-4401 ची जेव्हा तपासणी करण्यात आली, तेव्हा या मुलाबद्दल माहिती उघड झाली. तो काबुल येथून विमानात लपून भारतात आला. तो विमानाच्या लँडिंग गियरच्या जवळ लपला होता. २१ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ११.१० वाजता विमानाने लँडिंग केले. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर हा मुलगा एअरलाइनच्या सुरक्षा कर्मचार्यांना विमानाच्या जवळ फिरताना दिसून आला. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
“चौकशी केली असता असे समोर आले की, त्याने विमानातील रियर सेंट्रल लँडिंग गियरच्या कप्प्यात लपून प्रवास केला,” असे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) एका अधिकाऱ्याने सांगितले. हा मुलगा अफगाणिस्तानच्या कुंदुज शहरातली रहिवासी असल्याची बाब समोर आली आहे.
विमान कंपनीच्या सुरक्षा आणि अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांनी सुरक्षेची तपासणी केली असता, विमानातील रिअर लँडिंग गियरच्या भागात एक लहानसे लाल रंगाचे स्पीकर आढळले असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुलाचं पुढे काय?
संबंधीत अधिकाऱ्यांनी सविस्तर चौकशी केल्यानंतर आणि संबंधित सर्व अथॉरिटींनी आढावा घेतल्यानंतर त्या अफगाणी मुलाला त्याच दिवशी दुपारी KAM एअरलाईन्सच्या RQ 4402 विमानाने त्याच्या देशात परत पाठवण्यात आले, अशी माहिती सोमवारी देण्यात आली आहे.