उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकाल मंदिरात सोमवारी ‘भस्म आरती’ च्या वेळी लागलेल्या आगीत सेवकांसह १४ पुजारी जखमी झाले. जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत दिली जाईल, तसेच मोफत उपचार उपलब्ध करून दिले जातील, असे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले.

हेही वाचा >>> मॉस्को हल्ल्याप्रकरणी चौघांचा कबुलीजबाब

‘मंदिराच्या गर्भगृहात सकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी ही आग लागली.यात १४ पुजारी भाजून जखमी झाले आहेत. काही जणांवर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, आठ जण उपचारासाठी इंदूरमध्ये गेले आहेत. या घटनेच्या दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मृणाल मीणा आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी अनुकूल जैन हे दोघे ही चौकशी करणार असून, तिचा अहवाल तीन दिवसांत सादर करतील’, असे उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आगीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. यात जखमी झालेले सर्व भाविक लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच जखमींना शक्य ती सर्व मदत केली जात आहे असे त्यांनी ‘एक्स’वर लिहिले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी इंदूरमधील रुग्णालयात जाऊन महाकाल मंदिरातील आगीत जखमी झालेल्यांची भेट घेतली.