Carbide Gun Injuries in MP : दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे वेगवेगळे ट्रेंड समोर येत असातात, यामध्ये चकरी पासून ते रॉकेटपर्यंत वेगवेगळे फटाक्यांचे प्रकार पाहायला मिळतात. पण यावर्षी असा एक ट्रेंड समोर आला आहे जो अनेकांसाठी जीवघेणा ठरताना दिसत आहे. या वर्षीच्या दिवाळीत देशातील विविध भागांमध्ये ‘कार्बाइड गन’ची म्हणजेच देशी बंदुकीची क्रेझ पाहायला मिळत आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण या जुगाडामुळे जखमी झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
अवघ्या तीन दिवसांमध्ये मध्य प्रदेशात १२२ हून अधिक मुलांना डोळ्यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर यापैकी १४ मुलांनी आपली दृष्टी गमावली असल्याची बाब समोर आली आहे. एनडीटीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
अशा प्रकारच्या घटनांची सर्वाधिक झळ ही मध्य प्रदेशच्या विदिशा या जिल्ह्यात बसली आहे. १८ ऑक्टोबर रोजी या ‘कार्बाइड गन्स’वर सरकारने बंदी घातलेली असताना येथे याची उघड विक्री करण्यात आली. १५० ते २०० रुपये किमतीचे हे जुगाड खेळण्यासाठी बनवले जाते आणि याची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. पण याचा स्फोट हा एखाद्या बॉम्बप्रमाणे होतो, ज्यामुळे हे अत्यंत धोकादायक ठरू शकते.
हमिदीया रुग्णालयात उपचार घेत असलेली सतरा वर्षीय नेहाने रडत-रडत सांगितले की, “आम्ही घरी बनवलेली कार्बाइड गन विकत घेतली. जेव्हा तिचा स्फोट झाला, तेव्हा माझा एक डोळा पूर्णपणे भाजला. मला काहीच दिसत नाही.”
राज विश्वकर्मा नावाच्या दुसऱ्या एका पीडित मुलाने कबूल केले, “मी सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिले आणि घरीच फटाक्याची ही बंदुक बनवण्याचा प्रयत्न केला. ती माझ्या चेहऱ्यासमोरच फुटली… आणि त्यामुळे माझा डोळा गमावला.”
विदिशा पोलिसांनी या उपकरणांची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी सहा लोकांना अटक केली आहे. इन्स्पेक्टर आर. के. मिश्रा म्हणाले, “तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. या कार्बाइड गनची विक्री करणाऱ्या किंवा त्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांना कायदेशीर परिणाम भोगावे लागतील.”
भोपाळ, इंदौर, जबलपूर आणि ग्वाल्हेर येथील रुग्णालयांमध्ये, या कारबाइड गनमुळे डोळ्यांना जखम झालेल्या तरूण रुग्णांनी वॉर्ड भरले आहेत. केवळ भोपाळच्या हमिदीया रुग्णालयात ७२ तासांत २६ लगान मुलांना दाखल करण्यात आले आहे.
डॉक्टरांकडून देखील या कार्बाइड गनच्या वापराबद्दल इशारा दिला जात आहे. हमिदीया रुग्णालयाचे सीएमएचओ डॉ. मनिश शर्मा म्हणाले की, “या उपकरणामुळे थेड डोळ्यांना इजा होते. स्फोटामधून धातूचे कण आणि कार्बाइडची वाफ बाहेर पडते, ज्यामुळे रेटिना जळून जातो. आम्ही अशा अनेक रुग्णांवर उपचार करत आहोत, ज्यामध्ये मुलांच्या डोळ्यांतील बाहुल्यांना जखम झाली आहे, ज्यामुळे त्यांना कायमचे अंधत्व आले आहे.”
काही रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार केले जात आहेत, आणि कदाचित अनेक जणांना त्यांची दृष्टी पूर्णपणे कधीच परत मिळणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, लहान मुले प्लॅस्टिक किंवा टिन पाईप वापरू करून ही ‘कार्बाइड गन’ बनवत आहेत. या पाईपमध्ये गनपावडर, काडीपेटीच्या काड्यांचे डोके आणि कॅल्शियम कार्बाइड भरले जाते आणि एका छिद्रातून ते पेटवले जाते, ज्यामुळे मोठा आवाज होतो. आणि या स्फोटातून बाहेर पडणारे पदार्थ अनेकदा थेट चेहरा आणि डोळ्यांना आदळतात.
या धोकादायक ट्रेंडला इन्स्टाग्राम रील्स आणि यूट्यूब शॉर्ट्स मधून हवा मिळताना पाहायला मिळते. याचे ‘फायरक्रॅकर गन चॅलेंज’ म्हणून टॅग केलेले व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे तरूण लाईक्स मिळवण्याच्या प्रयत्नात ही कार्बाईड गन वापरताना दिसत आहेत.
