Punjab Toxic Liquor : पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील मजीठामध्ये विषारी दारू प्यायल्याने १४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या धक्कादायक घटनेनंतर अमृतसरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसेच ६ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती सांगितली जात आहे. हे सर्व लोक अमृतसरच्या सरकारी रुग्णालयात दाखल आहेत.
या घटनेबाबत अमृतसर ग्रामीणचे एसएसपी मनिंदर सिंग यांनी माहिती देताना सांगितलं की, “सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली होती की विषारी दारू प्यायल्याने १४ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचत कारवाई केली. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात मुख्य दारू पुरवठादार असलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली असल्याची माहिती मनिंदर सिंग यांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.
दरम्यान, या घटनेची प्राथमिक चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीने आणखी एका मुख्य दारू पुरवठादाराचं नाव सांगितलं असून आम्ही त्यालाही अटक केली आहे. तसेच या पुरवठादारांनी कोणत्या कंपन्यांकडून ही दारू खरेदी केली होती, याची देखील चौकशी सुरु असून आम्ही याबाबतची माहिती घेत आहोत, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
कडक कारवाई करण्याचे आदेश
दरम्यान, बनावट दारूच्या पुरवठादारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आम्हाला पंजाब सरकारकडून मिळाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता विविध ठिकाणी छापे टाकत आहोत. या प्रकरणात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा परिणाम पाच गावांत झाला असल्याची माहिती देखील पोलिसांनी सांगितली आहे.
अमृतसरच्या उपायुक्त काय म्हणाल्या?
अमृतसरच्या उपायुक्त साक्षी साहनी यांनी या घटनेबाबत बोलताना सांगितलं की, “माजिठामध्ये एक दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. काल रात्री आम्हाला कळलं की आम्हाला ५ गावांमधून माहिती समोर आली की दारू पिणाऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. आम्ही आमच्या वैद्यकीय पथकांना तातडीने पाठवलं. आमचं वैद्यकीय पथक अजूनही घरोघरी जाऊन तपासणी करत आहे. लोकांना काही लक्षणे असली तरी आम्ही त्यांना रुग्णालयात नेत आहोत. जेणेकरून आम्ही त्यांना वाचवू शकू. सरकार शक्य तितकी सर्व मदत करत आहे. या घटनेत आणखी मृतांची संख्या वाढू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच आम्ही काही दारू पुरवठादारांना अटक केली असून पुढील चौकशी सुरु आहे”, असं अमृतसरच्या उपायुक्त यांनी सांगितलं.