महाशिवरात्रीनिमित्त आज देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी भगवान शंकराच्या मंदिरांमध्ये लोक दर्शनासाठी रांगा लावत आहेत. राजस्थानच्या कोटा शहरातही भगवान शंकराची मिरवणूक निघाली होती. मात्र या मिरवणुकीदरम्यान एक दुर्घटना घडली असून त्यात १७ मुलं भाजली गेली आहेत. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कोटा शहरातील काली बस्ती याठिकाणी ही दुर्घटना घडली.

कोटाच्या पोलीस अधिक्षक अम्रिता दुहन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ही खूपच दुःखद घटना घडली. काली बस्ती परिसरातील लोक महाशिवरात्रीनिमित्त कलशमध्ये पाणी भरण्यासाठी मिरवणूक काढत होते. यात २० ते २५ मुलं आणि तेवढ्याच संख्येने महिलाही होत्या. त्यातील एका मुलाकडे २० ते २२ फुटांच्या लोखंडी पाईपला लावलेला एक झेंडा होता. हा झेंडा रस्त्यावरील हायटेन्शन तारेला लागला. ज्यामुळे तो गंभीररित्या भाजला गेला. त्याला वाचविण्यासाठी इतर मुले पुढे सरसावले मात्र त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. एमबीबीएस हॉस्टिपलमध्ये सर्वांवर उपचार केले जात आहेत.

दुहन पुढे म्हणाल्या की, ज्या मुलाच्या हातात झेंडा होता, तो गंभीररित्या भाजला गेला आहे. तर इतर मुलांनाही जखम झाली आहे. या घटनेची निश्चितच चौकशी केली जाईल.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केलं दुःख

या घटनेनंतर कोटाचे खासदार ओम बिर्ला यांनी दुःख व्यक्त केलं. मुलांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते रुग्णालयातही पोहोचले. मुलांच्या उपचारासाठी लागणारी हरएक प्रकारची मदत पुरविली जाईल, असेही ते म्हणाले. डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले की, जर गरज पडली तर मुलांवर उपचार करण्यासाठी त्यांना जयपूरला हलविले जाऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नातेवाईकांनी आयोजकांना केली मारहाण

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काली बस्ती परिसरात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मुले स्वतःहूनच एकटेच या मिरवणुकीत सामील झाले होते. विजेचा धक्का लागल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. मुलांच्या पालकांना आणि जवळच्या नातेवाईकांना दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रुग्णालयातच आयोजकांना धक्काबुक्की करत मारहाण केल्याचे सांगितले जाते.