झारखंडची राजधानी असलेल्या रांची शहरामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील छत्रा जिल्ह्यातील रुग्णालयामध्ये पोटदुखीची तक्रार घेऊऩ गेलेल्या दोन तरुणांना डॉक्टरांनी चक्क गर्भधारणेची चाचणी करण्यास सांगितले. एक ऑक्टोबर रोजी सिमारीया येथील सरकारी रुग्णालयामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.

पोटदुखीचा भयंकर त्रास होत असल्याने दोन तरुण डॉ. मुकेश कुमार यांच्याकडे तपासणीसाठी आले होते. या दोघांची तपासणी करुन झाल्यावर डॉक्टरांनी त्यांना गर्भधारणेची चाचणी करण्यास सांगितले. याचबरोबर डॉक्टरने या दोघांना एचआयव्ही, एचबीए, एचसीव्ही, सीबीबी आणि एचएच-टू यासरख्या अनेक चाचण्या करण्यात सांगितले.

२२ वर्षीय गोपाल गांझू आणि २६ वर्षीय कामेश्वर गांझू हे दोघे पोटदुखीच तक्रार घेऊन रुग्णालयात आले. त्यावेळी डॉक्टर कुमार यांनी त्यांना एएनसी चाचणी करण्यास सांगितली. हे दोघे डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रीप्शन घेऊन रुग्णालयातील पॅथलॉजी लॅबमध्ये गेले. त्यावेळी तेथील कर्चमाऱ्यांनी ही चाचणी गरोदर स्त्रीयांच्या गर्भधारणेची तपासणी करण्यासाठी असल्याचे या दोघांना सांगितले. घडलेल्या प्रकरणाची माहिती या दोघांनी गावकऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी या दोघांना डॉक्टरांविरुद्ध तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे या दोघांनी डॉक्टर कुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र डॉक्टर कुमार यांनी सर्व आरोप फेटाळून लावत आपण या दोघांना एएनसी चाचणी करण्यास सांगितले नव्हते असं सांगितलं. ‘सर्व आरोप खोटे असून मझी बदनामी करण्याचा हा डाव आहे. मी दिलेल्या प्रिस्क्रीप्शनमध्ये नंतर कोणीतरी त्या चाचण्या करण्याचा सल्ला लिहिला असण्याची शक्यता आहे,’ असं डॉक्टर कुमार म्हणाले आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची रुग्णालय प्रशासनाचे गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. अशाप्रकारे डॉक्टरांनी रुग्णांना विचित्र उपचार पद्धती सांगण्याची झारखंडमधील ही पहिलीच वेळ नाही. याआधी ऑगस्ट महिन्यामध्ये एका डॉक्टरने पोटदुखीवरील उपचार म्हणून एक महिलेला कंडोम वापरण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर हा सल्ला दिणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करत त्याला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले होते.