पीटीआय, कुर्नूल (आंध्र प्रदेश)
Andhra Pradesh Bus Accident: हैदराबादहून बंगळूरुला जाणाऱ्या एका खासगी बसला दुचाकीची धडक बसल्यानंतर लागलेल्या आगीत २० जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे कुर्नूल जिल्ह्यात घडली. अपघातातील बहुतांश मृतदेहांची ओळख पटविण्यात अडथळे येत असून, मृतांचे ‘डीएनए’ नमुने घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
हैदराबाद येथून बंगळूरुला ४० प्रवासी घेऊन जाणाऱ्या खासगी ‘स्लीपर’ बसची कुर्नूलमधील चिन्नाटेकुरजवळ पहाटे साडेतीनच्या सुमारास एका दुचाकीला धडक बसली. यानंतर ही दुचाकी बसखाली येऊन भीषण आग लागली. गाढ झोपेत असताना ही दुर्घटना घडल्याने अनेक प्रवासी वाचू शकले नाहीत, तर ज्वाळांनी जागे झालेल्या काही जणांना आपत्कालीन मार्गाने बाहेर पडण्यात यश आले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अपघातानंतर बसमधून १९ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, अशी माहिती कुर्नूल पोलीस उपमहानिरीक्षक कोया प्रवीण यांनी दिली. मृतांमध्ये दुचाकीस्वराचाही समावेश आहे.
अपघातात जखमी झालेल्या नऊ जणांवर कुर्नूल सरकारी रुग्णालयात, तर तीन जण खासगी रुग्णालयात दाखल आहेत. याप्रकरणी एका चालकाला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा फरार, अशी माहिती राज्याच्या गृहमंत्री व्ही. अनिता यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, मृतांच्या प्रत्येक नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून २ लाखांची, जखमींना ५० हजारांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली. ‘या कठीण काळात माझ्या भावना पीडितांबरोबर आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो,’ असेही पंतप्रधान म्हणाले.
बसच्या सुरक्षेत त्रुटी
दुचाकीला धडकल्यानंतर बसमध्ये शॉर्ट सर्किट झाली, त्यामुळे मुख्य दरवाजा बंद झाला. यानंतर आगीची तीव्रता वाढून काही मिनिटांतच बस पूर्णपणे जळून खाक झाली. या अपघातग्रस्त बसमध्ये कोणत्याही अग्निनियंत्रण सुविधा नव्हत्या. सुरक्षिततेच्या दृष्टीने बसमध्ये अनेक त्रुटी आढळल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक कोया प्रवीण यांनी सांगितले.
अपघाताच्या चौकशीसाठी समिती
आंध्र प्रदेश सरकारने बस आगीची चौकशी करण्यासाठी वाहतूक, रस्ते आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली आहे, अशी माहिती राज्याच्या गृहमंत्री व्ही. अनिता यांनी पत्रकार परिषदेत दिली. मृतांची ओळख पटविण्यासाठी ‘डीएनए’ चाचणी केली जाणार आहे, त्यासाठी १० विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. तर चार न्यायवैद्यकशास्त्र पथके आगीच्या कारणांचा शोध घेत आहेत, दोन पथके रासायनिक विश्लेषण करत आहेत. समितीच्या निष्कर्षांनुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
