संघर्षग्रस्त इराकमधील नजाफ शहरातून आतापर्यंत २०० भारतीयांना रविवारी विशेष विमानाने पहाटे ४.३० वाजता दिल्लीत आणण्यात आले. दरम्यान आणखी ६०० भारतीयांना येत्या दोन दिवसांत मायदेशी आणले जाणार असून अद्याप संघर्षांची झळ न पोहोचलेल्या दक्षिण इराकमधील २२०० जणांनी मायदेशी परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी एअर इंडियाची खास विमाने पाठवली जातील, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी दिली.
ज्यांना इराकमधून मायदेशी परतायचे आहे, अशांची एक यादी तयार करण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येकी सहा सदस्य असलेली चार फिरती पथके तयार करण्यात आली आहेत. नजफ, करबाला, बसरा या भागांत ही पथके तैनात करण्यात आली आहेत. ज्यांना संघर्षांची झळ पोहोचत आहे, त्यांना आम्ही इराक सोडण्याचाच सल्ला दिला आहे. परंतु ज्यांना सध्या भारतात आणणे शक्य नाही, त्यांच्यासाठी तिकीट ही एकमेव अडचण आहे, असे प्रवक्त्याने स्पष्ट केले.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने इराकमधील भारतीयांना परत आणण्याची व्यवस्था केली आहे. इराकमध्ये ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (आयएसआयएस)या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेल्या ४६ परिचारिकांची सुटका करण्यात आली. त्या शनिवारी भारतात परतल्या. या सर्व परिचारिका केरळमधील कोची येथील आहेत. रविवारी मायदेशी परतलेले २०० भारतीय हे किरकुक प्रांतात राहत होते.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jul 2014 रोजी प्रकाशित
२०० भारतीय मायदेशी
संघर्षग्रस्त इराकमधील नजाफ शहरातून आतापर्यंत २०० भारतीयांना रविवारी विशेष विमानाने पहाटे ४.३० वाजता दिल्लीत आणण्यात आले.
First published on: 07-07-2014 at 04:07 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2200 more indians want to leave iraq mea