साधारण दोन आठवड्यांपूर्वी २५ वर्षीय इंजिनिअर निखिल सोमवंशीचा मृतदेह तलावात आढळून आला. या घटनेनंतर आता त्याने कामाचा ताण सहन न झाल्याने आत्महत्या केली का? ही चर्चा होते आहे. याचं कारण एक रेड इट पोस्ट आहे. त्यामुळे ही चर्चा रंगली आहे. काय आहे हे प्रकरण आपण जाणून घेऊ.
रेड इट पोस्ट काय आहे?
८ मे च्या दिवशी बंगळुरुच्या अगरा तलावात निखिल सोमवंशी या इंजिनिअरचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात पोलिसांनी तक्रार केली आहे. दरम्यान निखिल सोमवंशीने आत्महत्या का केली? ही बाब समोर आली नव्हती. ज्याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा सुरु होण्याचं कारण आहे रेडिट पोस्ट. Kirgawazkutzo या आयडीवरुन ही पोस्ट लिहिण्यात आली आहे. ही पोस्ट लिहिणाऱ्याचा दावा आहे की निखिल सोमवंशी आणि मी बरोबर काम करत होतो. या पोस्टमध्ये जे आरोप करण्यात आले आहेत त्यावरुन कामाचा प्रचंड ताण, वर्क कल्चर हे सगळं सहन न झाल्याने निखिलने आत्महत्या केल्याची चर्चा सुरु झाली आहे.
काय म्हटलं आहे पोस्टमध्ये?
मला माहीत नाही की हा मुद्दा अजून चर्चेत का आला नाही? माझ्या एका सहकाऱ्याने कामाचा प्रचंड ताण सहन न झाल्याने शेवटी आयुष्य संपवलं. तो ‘ओला कृत्रीम’ या एआय कंपनीत काम करत होता. दोघांच्या टीमसह टीम लीड करत होता. बाकी दोघांनी कंपनी सोडली त्यामुळे तो कामाचा ताण सहन करत होता आणि त्याला त्याचा त्रास सहन करत होता. मी नाव घेणं योग्य नाही पण राजकिरण पनुगंतीला हे माहीतही नाही की लोकांना कसं सांभाळून घेतलं पाहिजे. असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
राजकिरण फक्त लोकांवर ओरडतो, शिव्या देतो
या पोस्टमध्ये पुढे म्हटलंय की, राजकिरण फक्त फोनवर बोलत असतो, लोकांना दोष देतो आणि त्यानंतर कुठे गायब होतो माहीत नाही. कारण तो अमेरिकेत असतो आणि कंपनीचे बहुतांश कर्मचारी बंगळुरुमध्ये राहतात. तो जेव्हा मिटिंग घेतो तेव्हा जे शब्द वापरतो ते तर फारच वेदनादायी असतात. नव्या लोकांना तो वाट्टेल तसं बोलतो. राजकिरण कायमच त्याचा राग लोकांवर काढतो. आमच्या एका सहकाऱ्याने वैतागून आत्महत्या केली तरीही राजकिरणच्या वागण्यात काहीही फरक झालेला नाही. मी तर माझे सहकारी चर्चा करताना ऐकलं आहे की जर ते या कंपनीत राहतील तर ते देखील काहीतरी टोकाचं पाऊल उचलतील. राजकिरणकडे लोकांना सांभाळण्याचं कसब नाही, तो फक्त लोकांवर खेकसत असतो आणि ओरडत असतो. एवढंच नाही तर निखिलच्या आत्महत्येचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे, ही बाब दयनीय आणि तेवढीच निषेधार्हही आहे.
माजी कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर काय सांगितलं?
दरम्यान ओला एआय च्या एका माजी कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर फायनान्शिअल एक्स्प्रेसला हे सांगितलं की निखिल सोमवंशी खूप तणावाखाली होता. आत्महत्या करण्याच्या दोन आठवडे आधीपासून तो ऑफिसला जात नव्हता. आता निखिलच्या आत्महत्येनंतर कुणीही मीडियाशी बोलायचं नाही अशी सक्त ताकीद कंपनीकडून तिथल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. या माजी कर्मचाऱ्याने असंही सांगितलं की त्यानेही कंपनी कामाचा प्रचंड तणाव आल्यानेच सोडली होती. हातात दुसरी नोकरी नव्हती पण कामाचा ताण सहन झाला नाही त्यामुळे नोकरी सोडली असं त्या कर्मचाऱ्याने सांगितलं.
कोण होता निखिल सोमवंशी?
निखिलल सोमवंशी ओला कृत्रीम या एआय कंपनीत काम करत होता. त्याने IISC मधून मास्टर्स केलं होतं आणि तो खूप हुशार विद्यार्थी होता.