woman ends life over fear of ants : लहान-मोठ्या अशा अनेक कारणांमुळे लोक त्यांचे जीवन संपवतात, अशा अनेक घटना नियमीतपणे कानावर येत असतात. अशाच एका घटनेत तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील एका २५ वर्षीय महिलेने कथितरित्या आत्महत्या केली, आणि याचे कारण हे सहन करण्याच्या पलीकडे वाटणारी मुंग्यांची भीती हे सांगितले जात आहे. पोलिसांनी गुरूवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंग्याची प्रचंड भीती वाटण्याच्या या स्थितीला वैद्यकीय भाषेत ‘मायरमेकोफोबिया’ (myrmecophobia) म्हणून ओळखले जाते.
ही घटना ४ नोव्हेंबर रोजी घडली. या महिलेचा विवाह २०२२ मध्ये झाला होता आणि त्यांना तीन वर्षांची मुलगी देखील आहे. अमीनपूर पोलिसांनी सांगितले की ही महिला घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली होती.
तपासकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला लहानपणापासूनच मुंग्यांची भीती वाटत होती आणि तिने मनचेरियल या तिच्या मूळ शहरात समुपदेशन देखील घेतले होते.
त्या दिवशी काय झालं?
त्या दिवशी या महिलेने तिच्या मुलीला नातेवाईकांच्या घरी सोडले आणि त्यांचे घर साफ करून झाले की तिला घेऊन जाईन असे सांगितले. जेव्हा त्या महिलेचा पती संध्याकाळी कामावरून परतला, तेव्हा त्याला घराचा मुख्य दरवाजा आतून बंद असल्याचे आढळून आले. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याने तो तोडला आणि त्याला महिलेचा मृतदेह आढळून आला.
चिठ्ठीत काय म्हटलं आहे?
घटनास्थळावरून एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. “सर, मला माफ करा, मी या मुंग्यांबरोबर राहू शकत नाही. काळजी घ्या (मुलीची). जपून राहा. अन्नावरम, तिरूपती १११६ रुपये…. येल्लम्मा वादी बिय्यमला विसरू नका,” असे चिठ्ठीत म्हटले आहे.
पोलिसांनी सांगितले की या महिलेने स्वच्छता करताना मुंग्या पाहिल्या असतील आणि त्या घाबरून गेल्या असतील, ज्यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि पुढील तपास केला जात आहे.
