37-digit amount credited in 20 year olds dead mother Bank Account : अचानक तुमच्या बँकेच्या खात्यात तुम्हाला मोजताही येणार नाही इतकी रक्कम आली तर तुम्ही काय कराल? पहिल्यांदा तर तुमचा डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील एका २० वर्षीय व्यक्तीबरोबर झाला आहे. त्यांच्या कोटक बँकेच्या बचत खात्यात अचानक १ सेप्टिलियन ट्रिलियन रुपये किंवा १ अनडेसिलियन (Undecillion) रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

बँक खात्यात जमा झालेली रक्कम ही ३७ अंकी असून ती १०,०१,३५,६०,००,००,००,००,००,०१,००,२३,५६,००,००,००,००,२९९ रुपये इतकी होती. द इकॉनॉमिक्स टाइम्सने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

पत्रकार सचिन गुप्ता यांनी एक्सवर यासंबधी एक पोस्ट केली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये “नोएडा येथे २० वर्षीय दीपकच्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यात ३६ अंकी रक्कम आली आहे. ही रक्कम १ अब्ज १३ लाख ५६ हजार करोड रुपये होते. माझं गणित थोडं कच्चं आहे. बाकी तुम्ही गुणाकार-भागाकार करू शकता. सध्या आयकर विभाग याची चौकशी करत आहे. बँक खाते गोठवण्यात आले आहे,” अशी माहिती देण्यात आली आहे.

नेमकं काय झालं?

न्यूज२४च्या रिपोर्टनुसार, २० वर्षीय दीपक हा त्यांची आई गायत्री देवी यांचे खाते चालवतो, गायत्री देवी यांचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला आहे.

३ ऑगस्टच्या रात्री दिपकला त्याच्या खात्यात १.१३ लाख कोटी (१,१३,५६,००० कोटी) जमा झाल्याचे एक नोटीफिकेशन आले. गोंधळलेल्या आणि घाबरलेल्या दीपकने हा मेसेज त्याच्या मित्रांना पाठवला आणि यामध्ये किती शून्य आहेत मोजण्यास सांगितलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी दिपक बँकेत या व्यवहाराची पुष्टी करण्यासाठी गेला. यावेळी बँक कर्मचाऱ्यांनी ही अफाट रक्कम जमा झाल्याचे स्पष्ट केले पण याबरोबरच त्याला संशयास्पदरित्या मोठी रक्कम जमा झाल्याने त्याचे अकाउंट गोठवण्यात आल्याचेही सांगण्यात आले. तसेच या प्रकरणाबाबत आयकर विभागाला देखील कळवण्यात आले, त्यांनंतर या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

दुसरीकडे ही बातमी सर्वत्र पसरली आणि दीपकला त्याच्या नातेवाईक मित्र आणि ओळखीच्या व्यक्तींकडून फोन येणे सुरू झाले. हे सगळं पाहूण दीपकने त्याचा फोन बंद करून ठेवला, असे इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

तपास सुरू

दरम्यान या प्रकारानंतर प्रशासनाकडून हा व्यवहार तांत्रिक बिघाड, बँकेची चूक किंवा संभाव्य मनी लॉन्ड्रिगचा प्रकार यापैकी नेमकं काय आहे याचा तपास केला जात आहे. इतका पैसा कुठून आला हे सखोल चौकशीनंतरच कळू शकेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान सोशल मीडियावर या घटनेवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या झात आहेत .

दरम्यान या प्रकरणात कोटक महिंद्रा बँकेने मात्र एका निवेदनात असा काही प्रकार घडल्याचे नाकारले आहे. “ग्राहकाच्या खात्यात मोठी रक्कम आल्याचे सांगणाऱ्या मीडिया रिपोर्ट्स चुकीच्या आहेत. यादरम्यान या पार्श्वभूमीवर आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या खात्याचे तपशील कोटकच्या मोबाईल बँकिंग अॅप किंवा नेट बँकिंग प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून तपासण्यास प्रोत्साहित करतो. कोटक महिंद्रा बँक पुष्टी करते की आमच्या सिस्टम्स सामान्यपणे काम करत आहेत, त्या सुरक्षित आणि पूर्णपणे कार्यरत आहेत.”