पंजाबमधील लुधियाना जिल्ह्य़ात शनिवारी सकाळी गॅस टँकरमधून अमोनिया वायूची गळती झाल्याने पाच जण ठार झाले असून, इतर १०० जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या चार तुकडय़ा भटिंडा येथून घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.
ही घटना दोरहा बाह्य़वळण रस्त्यावर लुधियानापासून २५ कि.मी. अंतरावर घडली. हा टँकर कालव्यानजीक अडकला असता त्यातून वायूगळती झाली. श्वसनास त्रास झाल्याने पाच जण मरण पावले तर १०० जणांची प्रकृती खालावली आहे. लुधियानातील विविध भागात त्यांना दाखल करण्यात आले असून २-३ जण वगळता इतरांची प्रकृती सुधारली आहे.
स्थानिक लोक टँकरमधून वायूगळती होताच घरातून बाहेर आले. मृतांमध्ये प्रौढ पुरुषांचा समावेश असून दोघांची नावे सतपाल (दोरहा) व अवतेज सिंग (जालंधर)आहेत. टँकरवर गुजरातची परवाना पट्टी होती. दिल्ली-लुधियाना महामार्गावर वायूगळतीची ही घटना घडली. खन्नाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक गुरुप्रीत सिंग गील यांनी सांगितले, की चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली. कारण वाहन फ्लायओव्हरवर अडकून पडले होते. त्यातच त्याचा व्हॉल्व्ह निकामी झाला. त्यामुळे वायूगळती झाली.
रात्रीच्या वेळी ही घटना घडली त्यामुळे फारशी रहदारी नव्हती, वाहन त्या जागेतून जाऊ शकेल की नाही याचा अंदाज चालकाला आला नाही. डोरहाचे पोलिस अधिकारी रजनीश कुमार सूद यांनी सांगितले, की मृतदेह लुधियानातील रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.