नियंत्रणरेषेवरील गोळीबारातून निर्माण झालेल्या तणावामुळे पाकिस्तान पुढील आठवड्यात ३६७ भारतीय कैद्यांची सुटका करुन एक सकारात्मक संदेश देणार आहे. या कैद्यांची २४ ऑगस्टला सुटका करण्यात येणार असल्याचे परराष्ट्र कार्यालयाच्या अधिका-याने सांगितले असून याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
पाकिस्तानच्या विविध तुरुंगांमध्ये अंदाजे ५०० भारतीय कैदी आहेत. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अझीझ यांनी संसदेत स्पष्ट केले की, पाकिस्तानातील तुरुंगांमध्ये एकूण ४९१ भारतीय कैदी आहेत. यामध्ये ४३७ मच्छिमारांचा समावेश आहे. नऊ भारतीय कैद्यांची आधीच सुटका करण्यात आली असून ७३ मच्छिमारांच्या सुटकेचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
याउलट, १ जुलै रोजी भारताने पाकिस्तानला दिलेल्या यादीनुसार ३८६ पाकिस्तानी कैदी भारतीय तुरुंगात असल्याचे अझीझ यांचे म्हणणे आहे. पण, पाकिस्तान परराष्ट्र कार्यालयाच्या नोंदणीनुसार एकूण ४८५ पाकिस्तानी भारतीय तुरुंगात असून त्यामध्ये १७२ मच्छिमार समावेश आहे. यावरून, ९९ पाकिस्तानींचा यामध्ये उल्लेखच नसल्याचे दिसते, असेही ते म्हणाले. याबाबतचा उलगडा करण्यासाठी भारताशी चर्चा करणार असल्याचे अझीझ यांनी म्हटले आहे.