एपी, कर्व्हिल
अमेरिकेतील टेक्सास प्रांतात झालेल्या जोरदार पावसामुळे नदीला आलेल्या पुरात ५१ जणांचा मृत्यू झाला असून, २७ मुली बेपत्ता आहेत. मृतांमध्ये १५ लहान मुलांचाही समावेश आहे. येथील पुराचे संकट अद्यापही गेले नसून, हवामान विभागाने याबाबतचा इशारा दिला आहे. बेपत्ता मुली आणि मृत मुले ८ ते १७ वयोगटातील आहेत.
केर काउंटीमध्ये १५ मुलांसह ४३ जणांचा मृत्यू झाला असून, शेजारील काउंटीमध्ये अन्य काही जणांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येकाचा शोध लागेपर्यंत शोधकार्य सुरू राहील, अशी माहिती केर काउंटीचे शेरीफ लॅरी लॅथा यांनी दिली. आतापर्यंत ८५० जणांची सुटका करण्यात यश आल्याची माहिती गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी दिली.
या ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे अवघ्या ४५ मिनिटांत ग्वाडालूप नदीला पूर आला. पाण्याची पातळी २६ फुटांपर्यंत वाढली. पुराच्या पाण्यात घरे, वाहने वाहून गेली. या ठिकाणी आयोजित ‘कॅम्प मिस्टिक’ या ख्रिाश्चन उन्हाळी शिबिरातील २७ मुली बेपत्ता झाल्या. पुरात शिबिराचे ठिकाण पूर्ण उद्ध्वस्त झाले. शिबिरातील मुलांव्यतिरिक्त अन्य किती जण बेपत्ता झाले, याची माहिती प्रशासनाने दिलेली नाही. हेलिकॉप्टर, बोट, ड्रोनच्या सहाय्याने वाहून गेलेल्यांचा शोध घेतला जात आहे.