पीटीआय, डेहराडून, सिमला

उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यातील मान या गावाजवळ शुक्रवारी सकाळी हिमस्खलन होऊन त्यामध्ये सीमा रस्ते संघटनेचे (बीआरओ) ५५ मजूर अडकले. त्यापैकी ३३ मजुरांची सुटका करण्यात यश आले असून त्यांना ‘इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस’च्या तळावर आणण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या २२ मजुरांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. रात्र आणि वाईट दृश्यमानतेमुळे बचाव कार्य तात्पुरते थांबवावे लागले आहे.

अडकलेले मजूर या भागात पडलेला बर्फ हटवण्याच्या कामासाठी तैनात होते. त्यांच्या छावणीवर हिमकडा कोसळून ते त्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनाने दिली. मात्र, आतापर्यंत कोणीही मृत झाल्याची माहिती नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चामोलीचे जिल्हा न्यायदंडाधिकारी संदीप तिवारी यांनी माहिती दिली की, हिमस्खलनानंतर मान आणि बद्रीनाथदरम्यान असलेली बीआरओची छावणी त्याखाली गाडली गेली. मजुरांची सुटका करण्यासाठी अनेक पथके काम करत असून त्यांच्यासमोर कठीण भूप्रदेश, जोरदार बर्फवृष्टी आणि पावसाचे आव्हान आहे. तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कामगार तिबेट सीमेच्या दिशेने सैन्याच्या हालचालीसाठी मार्गातील बर्फ हटवण्याचे काम नियमितपणे करतात. समुद्रसपाटीपासून ३,२०० मीटर उंचीवर असलेले मान हे गाव बद्रीनाथपासून तीन किलोमीटर अंतरावर असून भारत-तिबेट सीमेवरील सर्वात अखेरचे गाव आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी संभाषण करून परिस्थितीची माहिती घेतली. सर्व उपलब्ध साधनसामग्री वापरून अडकलेल्या मजुरांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.