ब्रिटीश भारतात येण्यापूर्वी ७० टक्के लोकसंख्या शिक्षित होती. तेव्हा बेरोजगारीही कमी होती, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( आरएसएस ) प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. हरयाणातील उंड्री-कर्नाल रोडवरील रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर मोहन भागवत बोलत होते.

“ब्रिटीश राजवटीपूर्वी देशातील ७० टक्के लोकसंख्या शिक्षित होती. तसेच, बेरोजगारीही नव्हती. तर, इंग्लंडमध्ये फक्त १७ टक्के लोक शिक्षित होती. पण, ब्रिटीशांनी त्यांची शिक्षण पद्धती भारतात आणि आपली त्यांच्या देशात लागू केली. त्यामुळे ब्रिटीश ७० टक्के आणि आम्ही १७ टक्के शिक्षित झालो,” असं मोहन भागवत यांनी सांगितलं.

हेही वाचा : भाजपाला विरोधकांचा, माध्यमांचा आवाज दडपून टाकायचा आहे; राहुल गांधींची लंडनमध्ये टीका

“भारताची शिक्षण व्यवस्था केवळ रोजगारासाठी नव्हे, तर ज्ञानाचेही माध्यम होती. सर्वांना स्वस्त दरात शिक्षण उपलब्ध होते. त्यामुळे शिक्षणाचा सर्व खर्च समाजाने उचलला. या शिक्षणातून पुढे आलेले अनेक कलाकार, विद्वान मंडळी जगभर ओळखले गेले,” असेही मोहन भागवत यांनी म्हटलं.

हेही वाचा : “८ वर्षांची असल्यापासून वडील माझं लैंगिक शोषण करत होते”, भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांनी सांगितला धक्कादायक अनुभव!

“सर्वांसाठी वैद्यकीय उपचार आणि शिक्षण ही देशासाठी महत्वाची गोष्ट आहे. कारण, वैद्यकीय उपचार आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी महाग होत चालल्या आहेत. म्हणून सर्वसामान्य नागरिकाला स्वस्त दरात वैद्यकीय उपचार आणि शिक्षण मिळण्याची गरज आहे,” असेही मोहन भागवत म्हणाले.