सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी ७१ वर्षीय वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सोमवारी घडला. राकेश किशोर असे या वकिलाचे नाव आहे. दरम्यान, या प्रकारानंतर सरन्यायाधीशांनी न्यायालयाचे कामकाज सुरूच ठेवत ‘या प्रकाराने विचलित होऊ नका, आम्हीही विचलित होणार नाही. या प्रकाराने माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही’ असे नमूद केले. या घटनेचा देशभरातून निषेध केला जात आहे.

सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना ही घटना घडली. दिल्लीतील मयूर विहार येथे राहणारे वकील राकेश किशोर सुनावणी सुरू असताना न्यायाधीशांसमोर गेले. त्यांनी बूट काढून न्यायाधीशांच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला. या वेळी न्यायालयात हजर असलेल्या सुरक्षारक्षकांनी तात्काळ हा हल्ला रोखला. यानंतर त्यांना ताब्यात घेत न्यायालयाच्या बाहेर नेले. त्यादरम्यान, या वकिलाने ‘सनातन का अपमान नही सहेंगे’, अशी घोषणा दिली.

सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस सर्वोच्च न्यायालयाच्या महाप्रबंधकांशी समन्वय साधून या प्रकरणाचा तपास करीत आहेत. हे कृत्य करण्यामागे वकिलाचा उद्देश काय होता, याचा तपासही पोलीस करीत आहेत. दरम्यान, गेल्या महिन्यात मध्य प्रदेशातील प्रसिद्ध

खजुराहो

मंदिर प्रकरणाच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी भगवान विष्णूंबद्दल केलेल्या टिप्पणीवरून वकील राकेश किशोर यांनी हा प्रकार केल्याची चर्चा आहे.

सरकारचे मौन आश्चर्यकारक नाही : सिबल

सर्वोच्च न्यायालयातील प्रकाराबाबत राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी सर्वांना निषेध करण्याचे आवाहन केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी या घटनेवर बाळगलेले मौन अजिबात आश्चर्यकारक नाही, असेही म्हटले. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या वकील संघटनेच्या सदस्याच्या असभ्य वर्तनाचा सर्वांनी जाहीर निषेध केला पाहिजे, कारण हा न्यायालयाच्या वैभवाचा अपमान आहे,’ असेही सिबल म्हणाले.

राज्यघटनेचा अपमान : पवार

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नाचा तीव्र शब्दांत निषेध केला. लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी न्यायव्यवस्था अस्तित्वात आहे. सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न हा केवळ न्यायव्यवस्थेवर हल्ला नाही तर आपल्या लोकशाहीचा, संविधानाचा आणि राष्ट्राचाही घोर अपमान आहे, अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली.

बार कौन्सिलकडून कारवाई

सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ने (बीसीआय) सोमवारी वकील राकेश किशोर यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. ‘वकिलाचे कृत्य प्रथमदर्शनी न्यायालयाच्या प्रतिष्ठेशी विसंगत आणि वकील कायदा, १९६१ आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया नियमांनुसार विहित व्यावसायिक आचार नियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे’, असे निलंबन आदेश जारी करताना ‘बीसीआय’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील मनन कुमार मिश्रा यांनी नमूद केले.