कर्नाटकात राजकीय हालचाली; काँग्रेसचे ९ आमदार सिद्धरामय्यांच्या भेटीसाठी रवाना

कर्नाटकच्या राजकारणात स्वतःचे मजबूत स्थान असणारे सिद्धरामय्या हे कुमारस्वामी यांना वरचढ ठरत असल्याचे चित्र आहे. कारण, नव्या सरकारमध्ये अनेक कारणांनी सिद्धरामय्या नाराज असल्याचे कळते.

सिद्धरामय्या (संग्रहित छायाचित्र)

कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार स्थापन झाल्यानंतर एच. डी. कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले. मात्र, कर्नाटकच्या राजकारणात स्वतःचे मजबूत स्थान असणारे सिद्धरामय्या हे कुमारस्वामी यांना वरचढ ठरत असल्याचे चित्र आहे. कारण, नव्या सरकारमध्ये अनेक कारणांनी सिद्धरामय्या नाराज असल्याचे कळते. दरम्यान, त्यांची भेट घेण्यासाठी एका मंत्र्यासह काँग्रेसचे ९ आमदार त्यांच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत.


दक्षिण कन्नडा जिल्ह्यातून काँग्रेसचे ९ आमदार बेलतानगगिरी येथे सिद्धरामय्या यांची भेट घेण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले सिद्धरामय्या यांची नाराजी पाहता राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सिद्धरामय्या मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या कामगिरीवर असंतुष्ट आहेत. यामुळे जेडीएसच्या आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली असून दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांमध्येही असंतोषाचे वातावरण आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे जेडीएस-काँग्रेसच्या युतीच्या समन्वय समितीचे अध्यक्षही आहेत. सिद्धरामय्या सध्या पूर्णतः सुटीवर असून ते कोणाचा फोनही घेत नाहीत. तर दुसरीकडे सिद्धरामय्या यांची आपले विश्वासून सहकारी एस. टी. सोमशेखर, बी. सुरेश आणि एन. मुनिरत्न यांच्याशी सातत्याने चर्चा करीत आहेत.

कर्नाटकातील युती सरकार आपल्या मंत्री आणि आमदारांच्या नाराजीमुळे भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसच्या असंतुष्ट नेत्यांकडून चर्चेचे कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. दरम्यान, काँग्रेसचे बहुतांश नाराज नेते सरकार पाडण्यासाठी भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा असल्याने कर्नाटक सरकारसाठी हे सर्वात मोठे आव्हान आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 9 karnataka congress mlas including one minister leave for dakshina kannada districts belthangady to meet siddaramaiah