पीटीआय, पाटणा

विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’मध्ये (इंडिया) आणखी काही राजकीय पक्ष सहभागी होणार आहेत. मुंबईत होणाऱ्या आगामी बैठकीत हे पक्ष त्यात सामील होण्याची शक्यता असल्याची माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी दिली. भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नितीश यांनी ‘इंडिया’मध्ये सामील होण्याची शक्यता असलेल्या पक्षांची नावे मात्र यावेळी जाहीर केली नाहीत. या बैठकीत निवडणुकीतील जागावाटपासारख्या मुद्दय़ांवर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>‘चांद्रयान-३’ नव्या भारताच्या जिद्दीचे प्रतीक; ‘मन की बात’मध्ये मोदींचे गौरवोद्गार

पाटणा येथे पत्रकारांशी बोलताना नितीशकुमार यांनी सांगितले, की आम्ही मुंबईत होणाऱ्या बैठकीत लोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ‘इंडिया’च्या रणनीतीसंदर्भात चर्चा करू. यावेळी जागावाटपाबाबतही चर्चा केली जाईल आणि इतर अनेक मुद्दय़ांवर धोरण निश्चित केले जाईल. आणखी काही पक्ष आमच्या आघाडीत सामील होतील. मला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शक्य तितक्या पक्षांना एकत्र आणायचे आहे. मी त्या दिशेने काम करत आहे. यात माझी कोणतीही व्यक्तिगत अपेक्षा नाही, असेही ते म्हणाले.