भाजपचे महासचिव आणि नरेंद्र मोदी यांचे खास असलेले अमित शहा यांच्या ‘बदला’ घेण्याच्या वादग्रस्त विधानाची दखल घेत त्यांना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली. गुरूवारी अमित शाह यांनी दंगल पिडीत मुझफ्फरनगरपासून ४० किमी अंतरावरील राजहार गावामध्ये अमित शहा यांनी छोटी सभा घेतली. या सभेत त्यांनी “जाटांची हत्या करणाऱ्यांना नुकसान भरपायी व संरक्षण देणाऱ्या सरकारला या निवडणुकीमध्ये उलथवून टाकणे आवश्यक आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून बदला घेवून आपली इज्जत राखणे आवश्यक आहे,” असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसेच माणुस एकवेळ उपाशी राहील, एकवेळ तो झोप घेणार नाही. पण, तो अपमान सहन करणार नाही. अपमानका बदला तो लेना पडेगा,” असे अमित शहांनी आपल्या भाषणामधून सांगितले होते.
अमित शहांच्या या विधानानंतर भाजप आणि त्यांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावरही कडक कारवाई करत पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये कॉंग्रेसने माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा आधार घेतला आहे. ‘दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करण्यासाठी अमित शहा यांनी भडक भाषण केले,’ असा आरोप कॉंग्रेसने केला. याविषयी प्रतिक्रिया देताना “भाजप, मोदी आणि अमित शहा यांना 2002 मधील गुजरात दंगलींची पुनरावृत्ती घडवून आणायची आहे. त्यांना द्वेषपूर्ण राजकारण करायचे आहे. शहा यांच्यासह मुझफ्फरनगर दंगलीतील आरोपी आमदार सुरेश राणा यांच्याविरुद्ध ‘एफआयआर’ दाखल केली जावी, अशी विनंती आम्ही राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला करणार आहोत. तसेच देशातील कोणत्याही भागामध्ये प्रचार करण्यास त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.