वृत्तसंस्था चेन्नई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विविध राज्यांतील नागरिकांनी परस्परांशी इंग्रजीऐवजी हिंदीत संवाद साधावा, असे आवाहन केले होते. त्यावर तमिळनाडूतील राजकीय पक्षांनी तीव्र टीका केली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांनी मनोन्मणियम सुंदरम पिल्लई यांनी लिहिलेल्या व एम. एस. विश्वनाथन यांनी संगीतबद्ध केलेल्या तमिळनाडू गीताच्या ओळींसह तमिळ देवतेचे चित्र समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले. रेहमान यांनी ट्विटर, फेसबुक आणि इन्स्ट्राग्रामवर हे प्रसिद्ध केले असून, विसाव्या शतकातील तमिळ कवी भारतीदासन यांच्या थामिलियक्कम या काव्यसंग्रहातील ‘प्रिय तमिळ भाषा हे आमच्या अस्तित्वाचे मूळ आहे’ या ओळीही रेहमान यांनी यासोबत दिल्या आहेत.
३७ व्या सांसदीय भाषा समितीच्या बैठकीत बोलताना शहा यांनी सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकारी व्यवहार अधिकृत भाषेत करण्याचे ठरवले आहे. यामुळे हिंदीचे महत्त्व वाढेल. आता देशाच्या एकात्मतेसाठी अधिकृत भाषा महत्त्वाची भूमिका बजावेल. विविध राज्यांच्या नागरिकांनी परस्परांशी संवाद साधताना भारतीय भाषेत संवाद साधायला हवा. त्यावर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी यावर टीका करताना म्हटले आहे, की केंद्रातील भाजप सरकार भारताची विविधतेची ओळख संपवायचा प्रयत्न करत आहे. शहा पुन्हा पुन्हा तीच चूक करत आहेत. परंतु, ते यशस्वी होणार नाहीत.
तमिळ भाषा समर्थक.
रेहमान यांनी भाषिक वादात उडी घेण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. जून २०१९ मध्ये जेव्हा सर्व राज्यांत तीन भाषा धोरण अनिवार्य करण्याचे प्रयत्न सुरू होते, तेव्हा रेहमान यांनी केलेल्या ट्वीटवरून त्याच्या चाहत्यांत ‘ऑटोनॉमस तमिळनाडू्’ असे तमीळनाडूच्या स्वायत्ततेचे ‘हॅश टॅग’ लोकप्रिय झाले होते. तसेच तमिळनाडूत हिंदी अनिवार्य न करण्याचा निर्णय योग्य असल्याचे रेहमानने यापूर्वी म्हटले होते.