नवी दिल्ली : राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळय़ाला उपस्थित राहिल्याबद्दल ‘ऑल इंडिया इमाम संघटने’चे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांच्याविरोधात फतवा काढला असताना, सोमवारी इलियासी यांच्या नेतृत्वाखालील विविध अल्पसंख्याक समाजांच्या धर्मगुरूंच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विश्वगुरू बनवण्याकडे वाटचाल करत आहेत. हा देश एक आहे, इथले वेगवेगळे समाज एकत्र आहेत. नवा भारत हा श्रेष्ठ भारत आहे, हा संदेश देण्यासाठी विविध धर्मगुरू संसदेत आलो आहेत’, असे इलियासी यांनी पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर संसदेत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हेही वाचा >>>माजी पंतप्रधान नेहरूंनी खरंच भारतीयांना ‘आळशी’ म्हटलं होतं? वाचा १९५९ सालचं ‘ते’ भाषण
‘इंडियन मायनॉरिटी फाऊंडेशन’च्या वतीने आम्ही मोदींची भेट घेतली. एकता व अखंडतेसाठी आम्ही काम करतो. आमच्या कामाची मोदींनी प्रशंसा केली, असे जैन गुरू विवेक मुनी यांनी सांगितले. या शिष्टमंडळात मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन विविध समाजातील धर्मगुरूंचा समावेश होता. त्यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचीही संसदेच्या आवारात भेट घेतली.‘भारत एक असून सर्व भारतीय एक आहेत, असा ऐक्याचा संदेश देण्यासाठी आम्ही संसदेत आलो आहोत’, असे या धर्मगुरूंनी सांगितले.