आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी चेन्नईमध्ये गुरुवारी लिलावप्रक्रिया पार पडली. यामध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला मुंबई इंडियन्स संघानं २० लाख रुपयांत करारबद्ध केलं आहे. अर्जुन तेंडुलकर याला मुंबईनं विकत घेतल्यानंतर त्याच्यावर आणि मुंबईवर काही नेटकऱ्यांनी टीकेचा वर्षाव केला. वडिलांच्या कर्तुत्वामुळे अर्जुनला मुंबई संघानं विकत घेतल्याची टीकाही सोशल मीडियावर अनेकांनी केली. अर्जुन तेंडुलकर लिलावाच्या मैदानात उतरण्यापूर्वीच सोशल मीडियावर ‘नेपोटिज्म’वरुन ट्रोलिंग सुरु झाली होती. यावर भारताच माजी फलंदाज आकाश चोप्रा यानं आपलं मत व्यक्त केलं आहे. मुंबई संघानं अर्जुन तेंडुलकर याच्यावर डाव का खेळला? यामागील कारण आकाश चोप्रा यानं सांगितलं आहे.
आकाश चोप्रा म्हणाला की, ‘अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या संघासोबत राहून खूप काही शिकू शकतो. तसेच सचिन तेंडुलकरकडूनही त्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. आता तो एका यशस्वी आयपीएल संघाचा भाग झाला आहे. मुंबईच्या संघातील अनुभवी खेळाडूंचा अर्जुन तेंडुलकरला नक्कीच फायदा होईल. देशांतर्गत क्रिकेट सामन्यात त्यानं मुंबईकडून बळी घेतले आहेत. त्याच्यावर सचिनचा मुलगा म्हणून आयपीएलमध्ये बोली लागलेली नाही. तो काही ना काही करु शकतो. मुंबईला अर्जुन तेंडुलकर हवा होता. आणि त्यांनी तो खरेदीही केला.’
आणखी वाचा- IPL 2021: अर्जुन तेंडुलकरला विकत घेतल्याने होणाऱ्या टीकेला मुंबई इंडियन्सचं उत्तर
अर्जुन तेंडुलकरसाठी मुश्ताक अली स्पर्धा काही खास गेली नव्हती. या स्पर्धेत अर्जुनला फक्त दोन सामन्यात मुंबईचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. अर्जुन अष्टपैलू खेळाडू म्हणून खेलतो. वेगवान गोलंदाजीसोबत अर्जुन विस्फोटक फलंदाजी करण्यासही सक्षम आहे.
मुंबई इंडियन्सनं लिलावात कोणत्या खेळाडूंना घेतलं –
नाथन कूल्टर-नाइल: पाच कोटी रुपये
अॅडम मिल्नेः 3.20 कोटी रुपये
पियूष चावलाः 2.40 कोटी रुपये
जेम्स नीशामः 50 लाख रुपये
युद्धवीर चरकः 20 लाख रुपये
मार्को जेनसनः 20 लाख रुपये
अर्जुन तेंदुलकरः 20 लाख रुपये