पीटीआय, नवी दिल्ली

दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लादण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार मोठा राजकीय कट रचत असल्याचा आरोप दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी शुक्रवारी केला. तर, दिल्लीच्या विधानसभेत ७०पैकी ६२ आमदार असलेल्या आपला राष्ट्रपती राजवटीची भीती वाटते हे आश्चर्यकारक असल्याची प्रतिक्रिया भाजपने व्यक्त केली.

शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत आतिशी यांनी आरोप केला की, ‘‘अरविंद केजरीवाल यांची अटक हा सरकार उलथवण्याचा राजकीय कट आहे. आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून असे समजले आहे की, येत्या काही दिवसांमध्ये दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल. पण दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करणे बेकायदा आणि जनमताविरोधात असेल’’. त्या पुढे म्हणाल्या की, अलिकडील काळात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता सूचित करणारे अनेक प्रसंग घडले आहेत.

गेल्या काही महिन्यांमध्ये दिल्लीत कोणत्याही वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही असेही त्या म्हणाल्या. आतिशी यांचे सहकारी सौरभ भारद्वाज यांनीही हाच आरोप केला. दिल्लीमध्ये २०१४मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा >>>“डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वतः आले तरी संविधान संपवू शकत नाहीत”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान

दुसरीकडे, भाजपचे दिल्ली अध्यक्ष विरेंद्र सचदेव यांनी आपच्या आरोपांवर टीका केली. विधानसभेत बहुमत असलेल्या आपला राष्ट्रपती राजवटीची भीती वाटते हे आश्चर्यकारक आहे असे ते म्हणाले. तसेच त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.

विभागांमध्ये पदे रिक्त आहेत पण नियुक्त्या केल्या जात नाहीत. मंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकांना अधिकाऱ्यांना आचारसंहितेचे कारण देत उपस्थित राहणे थांबवले आहे. नायब राज्यपाल गृह मंत्रालयाला दिल्ली सरकारच्या कामकाजावर पत्र लिहित आहेत. – आतिशी, मंत्री, दिल्ली सरकार

आतिशी यांचा नेहमीचा पीडित असल्याचे खोटे कथन आणि ‘ऑपरेशन लोटस’च्या गोष्टीची जागा आज सकाळी नवीन कहाणीने घेतली. आज त्या म्हणाल्या की, दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू केली जाण्याची शक्यता आहे. अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला तर अधिक चांगले होईल. त्यांनी नवीन मुख्यमंत्र्यांकडे कारभार सोपवावा आणि दिल्लीचे प्रशासन सुरळीतपणे चालू द्यावे. – विरेंद्र सचदेव,दिल्ली अध्यक्ष, भाजप