दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स पाठवले आहे. अबकारी कर धोरणासंदर्भात त्यांची चौकशी केली जाणार आहे. परंतु, केजरीवाल या चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. चौकशीसाठी गेल्यानंतर केजरीवाल यांना अटक केली जाईल आणि त्याच काळात भाजपा दिल्लीतलं आप सरकार पाडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहेत. सरकार पाडण्यासाठीच भाजपाने हा डाव रचल्याचा आरोपही आप नेत्यांकडून होत आहे.

दरम्यान, केजरीवाल यांना अटक झालीच तर भविष्यात दिल्लीचं मुख्यमंत्रीपद कोण सांभाळणार, आपचं नेतृत्व कोण करणार? याबाबत आपमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू असल्याचं सांगितलं जात आहे. केजरीवाल यांना अटक झालीच तर काय करायचं, याबाबत आप नेत्यांनी एक योजना आखली आहे. केजरीवाल यांनी मंगळवारी (७ नोव्हेंबर) आप नेत्यांची आणि आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मंत्री आतिशी मारलेना यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या बैठकीविषयी माहिती देताना आतिशी मारलेना म्हणाल्या, आपच्या सर्व आमदारांनी केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदी कायम राहण्याचा आग्रह केला आहे. तसेच केजरीवाल यांना विनंती केली की तुरुंगात गेलात तरी तुम्हीच मुख्यमंत्रीपदी कायम राहावं. कारण तुम्हाला जनतेनं निवडून दिलं आहे. हवं तर तुम्ही तुरुंगातून मुख्यमंत्री म्हणून दिल्लीचा कारभार पाहा.

आप नेत्यांच्या या बैठकीबाबत भाजपाचे राष्ट्रीय सचिव मनजिंदर सिंग सिरसा यांनी मोठा दावा केला आहे. सिरसा म्हणाले, केजरीवाल यांनी मंगळवारी त्यांच्या आमदारांची बैठक घेतली आणि ते या बैठकीत म्हणाले, मला ईडीने अटक केली तर मी तिहार जेलमधून राज्याच्या कारभार सांभाळेन. कारण केजरीवाल यांना पहिल्या दिवसापासूनच माहिती आहे की त्यांना अटक होणार आहे. हे ३५० कोटी रुपयांच्या गैरव्यहाराचं प्रकरण आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याचा उल्लेख केला आहे. या प्रकरणात त्यांचे मंत्री मनिष सिसोदिया यांना जामीनही मिळाला नाही.

हे ही वाचा >> “त्यांना शरम वाटत नाही”, ‘त्या’ वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींची नितीश कुमारांवर टीका, इंडिया आघाडीवरही हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले, केजरीवाल यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे आर्थिक व्यवहार केले आहेत. तसेच त्यातून त्यांनी स्वतःसाठी महाल बांधण्याचं काम केलं आहे. केजरीवाल यांना माहिती आहे की, या प्रकरणात ते तुरुंगात जाणार आहेत. मी आधीही म्हटलं होतं की, केजरीवाल चौकशीला जाणार नाहीत. त्याप्रमाणे ते नाहीच गेले. ते गेले नाहीत कारण त्यांना त्यांच्या आमदारांचं मन वळवायचं आहे. केजरीवाल यांना त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्रीपदी बसवायचं आहे. सुनीता केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री बनवण्यासाठी अरविंद केजरीवाल त्यांच्या आमदारांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही गोष्ट कालच्या बैठकीनंतर स्पष्ट झाली आहे. मला आपच्या एका वरिष्ठ नेत्यांने याबाबतची माहिती दिली आहे. परंतु, आप आमदारांनी केजरीवाल यांच्या या प्रस्तावाला पूर्णपणे विरोध केला आहे. आपचे आमदार केजरीवाल यांना म्हणाले, विरोधक आपवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, तुमच्यावर आरोप होत आहेत, अशातच जर तुमच्या पत्नीला मुख्यमंत्री केलं तर आपल्यावर घराणेशाहीचे आरोप होतील. ज्यामुळे आपचं नुकसान होईल.