राजकारणाचा विचार केल्यास जनतेची स्मरणशक्ती अतिशय कमी असते, असे म्हटले जाते. मात्र दिल्ली महापालिकेतील आम आदमी पक्षाचा पराभव पाहता दिल्लीकर केजरीवाल यांची अर्धवट राहिलेली आश्वासने विसरले नसल्याचे दिसत आहे. केजरीवाल यांनी दिलेली अनेक आश्वासने पूर्णत्वास गेली नाहीत. त्याचा फटका केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला बसला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भ्रष्टाचारावर पूर्ण अंकुश नाही
भ्रष्टाचार संपवण्यासाठीच आम आदमी पक्षाचा जन्म झाला असल्याचे अरविंद केजरीवाल सांगत होते. केजरीवाल यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांचे स्टिंग करुन पाठवण्यास सांगितले होते. मात्र अरविंद केजरीवाल यांच्या या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. दिल्लीतील सरकारी कार्यालयांमधील भ्रष्टाचार थांबला असा दावा आजही करता येणार नाही.

व्हीआयपी कल्चर कायम
आपला पक्ष आम आदमीसाठी असल्याचे म्हणत अरविंद केजरीवाल सत्तेवर आले होते. केजरीवालांनी लाल दिवा घेण्यास नकार दिला. मात्र लवकरच त्यांच्या सुरक्षेवर होणाऱ्या खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. केजरीवाल यांचे मंत्री साधेपणाने राहात असल्याचे त्यांच्या वर्तणुकीतून दिसून आले नाही. त्यामुळे इतर पक्षांचे मंत्री आणि आम आदमी पक्षाचे मंत्री यामध्ये फारसा फरक आढळून आला नाही.

महिला सुरक्षेसाठी ठोस पावले नाहीत
निर्भया प्रकरणानंतर देशाच्या राजधानीत महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. सार्वजनिक ठिकाणी १० ते १५ लाख सीसीटीव्ही लावण्याचे आश्वासन आम आदमी पक्षाने दिले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. यासोबतच १० हजार महिला होमगार्ड्सची नियुक्तीदेखील अद्याप झालेली नाही. दिल्ली सरकारला डीटीसी बसमध्येही महिला मार्शन तैनात करता आलेल्या नाहीत.

फ्री वाय-फायचे आश्वासन हवेत
सत्तेत आल्यावर १३ महिन्यांनंतर जून २०१६ मध्ये केजरीवाल सरकारने शहरात मोफत वाय-फाय नेटवर्कची योजना समोर ठेवली होती. याअंतर्गत पूर्व दिल्लीमध्ये ३ हजार हॉट स्पॉट पॉईंटच्या माध्यमातून इंटरनेट मोफत देण्याची ब्लू प्रिंट तयार करण्यात आली होती. दिल्लीच्या इतर भागांमध्ये फायबर नेटवर्कची कमतरता असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप दिल्लीकरांसाठी मोफत वाय-फाय स्वप्नच आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaps arvind kejriwal unfulfilled promises led to defeat of aap in mcd elections
First published on: 26-04-2017 at 15:50 IST