जमात-उद-दावाचा म्होरक्या अब्दुल रहमान मक्की याने हाफिज सईद प्रमाणेच भारताविरोधात गरळ ओकली आहे. जम्मू काश्मीर भागात आता जिहाद आणखी तीव्र करणार असल्याचे त्याने म्हटले आहे. पाकिस्तान सरकारच्या डोळ्यादेखत त्याने हे वादग्रस्त भाषण केले आहे.

३ मार्च रोजी काश्मीरच्या बांदीपोरा भागात सुरक्षा दलांनी दहशतवादी अबू वलीद मोहम्मदला ठार केले होते, त्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी लाहोरच्या अल-दावा मॉडेल स्कूल मध्ये अब्दुल रहमान मक्की आला होता, त्यावेळी केलेल्या भाषणात त्याने भारतात जिहाद अधिक तीव्र करणार असल्याचे म्हटले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने ही यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध केली आहे.

अबू वलीद मोहम्मद हा किती चांगला होता त्याने देशासाठी कसे मरण पत्करले या आशयाचे गोडवेही मक्कीने आपल्या भाषणातून गायले. तसेच जमात-उद-दावाच्या ठार झालेल्या इतर दहशतवाद्यांच्या आठवणीही उपस्थितांना सांगितल्या. काश्मीर आपल्याला हिंदू शक्तींच्या तावडीतून सोडवायचा आहे असाही दावा मक्कीने आपल्या भाषणात केला आहे.

याच वर्षी मार्च महिन्यातच अब्दुल रहमान मक्कीला जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचे प्रमुखपद देण्यात आले आहे. हाफिज सईदला मुंबई हल्ला प्रकरणात नजरकैदेत ठेवण्याच्या निर्णयाचीही त्याने निंदा केली आहे. पाकिस्तानी नेतृत्त्वाने दिल्लीशी मैत्री करण्याऐवजी पाकिस्तानची ताकद वाढवावी आणि काश्मीर स्वतंत्र कसा होईल याकडे लक्ष द्यावे असेही मक्कीने म्हटले आहे.

मक्कीने याच कार्यक्रमाच्या वेळी मिली मुस्लिम लीग आणि जमात-उद-दावा एकत्र काम करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. या कार्यक्रमाच्या वेळी अबू वलीद मोहम्मदच्या वडिलांनीही भाषण केले. लाहोरमधील शाळांमध्ये जिहादचे धडे दिले जातात हे या दोघांच्या भाषणांवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.