पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांना पिटाळून लावताना २७ फेब्रुवारी रोजी विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे लढाऊ विमान पाकिस्तानमध्ये कोसळले होते. ही घटना घडण्यापुर्वीच भारतीय हवाई दलाच्या वॉर रूममधून अभिनंदन यांना परत फिरण्याचा संदेश देण्यात आला होता. पण विमानातील जुन्या तंत्रज्ञानामुळे त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचलाच नाही, अशी माहिती आता समोर आली आहे.

पुलवामात दहशतवाद्यांनी लष्काराच्या ताफ्यावर भयंकर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी बालाकोटमधील दहशतवादी तळावर हवाई हल्ला केला. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी २७ फेब्रवारी रोजी सकाळी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पाकच्या विमानांना भारतीय हवाई दलाने परतवून लावले होते. तसेच पाकिस्तानचे एफ-१६ विमानही पाडले होते. मात्र, या विमानांचा पाठलाग करताना भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे लढाऊ विमान अपघातग्रस्त झाले होते. त्यानंतर पाकिस्तानने त्यांना ताब्यात घेऊन भारताच्या हवाली केले होते.

दरम्यान, पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय लढाऊ विमानांना वॉर रूममधून परत फिरण्याचा संदेश पाठवण्यात आला होता. तो त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही, अशी माहिती भारतीय हवाई दल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. पाकिस्तानने मिग २१ बायसन मधील संदेश यंत्रणा जॅमरच्या साहाय्याने खंडित केली होती. त्यामुळे अभिनंदन यांना संदेश पोहोचला नाही. अभिनंदन यांचे मिग २१ बायसन हे लढाऊ विमान जॅमररोधक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असते, तर अभिनंदन सूचना मिळताच माघारी फिरले असते आणि पुढील दुर्घटना टळली असती, असे हवाई दलाने म्हटले आहे.

दर्जेदार आणि सुरक्षित तंत्रज्ञानाची गरज असल्याची बाब हवाई दलाने प्रथमच मांडलेली नाही. यापूर्वीहा हा मुद्दा अधोरेखित करण्यात आलेला आहे. संदेश यंत्रणातील दोष वेळीच दूर करण्यात आले असते, तर अभिनंदन वर्थमान यांच्यासोबत जे घडले ते टळले असते, असे प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.