हिंमत असेल तर अमित शाहांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी, जर या निवडणुकीत माझा पराभव झाला, तर मी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेईन, असं आव्हान ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी दिले आहे. पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातील एका प्रचार सभेत बोलताना त्यांनी हे विधान केलं. यावेळी बोलताना त्यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार टीकाही केली.

नेमकं काय म्हणाले अभिषेक बॅनर्जी?

“जर भाजपाला वाटत असेल की मी सक्रीय राजकारणातून निवृत्त्व व्हावं, तर भाजपापुढे तीन पर्याय आहे. पहिला पर्याय म्हणजे त्यांनी पश्चिम बंगालचे जीएसटीचे पैसे परत करावे, मी २४ तासांत राजकारणातून निवृत्ती घेईन, दुसरा पर्याय त्यांनी पंतप्रधान आवास योजनेचा थकीत निधी द्यावा, मी लगेच निवृत्ती घेईन आणि तिसरा पर्याय म्हणजे अमित शाह यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवावी, माझा जर पराभव झाला, तर मी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेईल”, अशी प्रतिक्रिया अभिषेक बॅनर्जी यांनी दिली.

हेही वाचा – “मी जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना…”, पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?…

“शाहांकडून नैतिक मुल्ये शिकण्याची गरज नाही”

पुढे बोलताना, “अमित शाह हे कधीच कोणत्या आंदोलनात सहभागी झाले नाही. त्यांना गुजरातमध्ये तडीपार करण्यात आले होते. ते तुरंगातही जाऊन आले आहेत. त्यांच्याकडून आम्हाला नैतिक मुल्ये आणि विचारधारा शिकण्याची गरज नाही”, अशी टीकाही त्यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सगळेच अमित शाहांसारखे नसतात”

दरम्यान, पश्चिम बंगालमधील एका सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांना त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे, अशी टीका अमित शाह यांनी केली होती. या टीकेला अभिषेक बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर दिले. “काहीही संबंध नसताना अमित शाह यांनी त्यांच्या मुलाला बीसीसीआयचे सचिव बनवले आहे, त्यामुळे सगळेच अमित शाहांसारखे नसतात”, असा टोलाही त्यांनी लगावला.