लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांकडून भाजपावर संविधान बदलण्याचे आणि आरक्षण रद्द करण्याचे आरोप करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यानंतर प्रचाराचा रोख आरक्षण, संविधान आणि धार्मिक मुद्द्यांवर अधिक असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस आघाडीची सत्ता आल्यास वारसा कर लादून हिंदूंची संपत्ती अधिक मुले असणाऱ्या म्हणजे मुस्लीम समाजात वाटली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. जवळपास प्रत्येक सभेतून त्यांनी ही टीका केली आहे. आता तेलंगणा येथे प्रचार सभेत बोलत असताना मुस्लीम समाजाबाबत आणखी एक विधान केले आहे.

तेलंगणाच्या मेडक जिल्ह्यात प्रचारसभेला संबोधित करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मी जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण मिळू देणार नाही. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी यांच्या आरक्षणाला कोणत्याही परिस्थितीत धक्का लागू देणार नाही.” तसेच काँग्रेस स्वार्थासाठी संविधानाचा अपमान करत आहे, अशीही टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

“त्यांनी (काँग्रेस) संसदेचे काम चालू नये म्हणून गोंधळ घातला. ते निवडणूक आयोग, ईव्हीएमवर संशय घेतात आणि आता मतपेटीसाठी संविधानाचा अपमान करत आहेत. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत दलित, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी यांच्या वाट्याचे आरक्षण मुस्लिमांना धर्माच्या आधारावर मिळू देणार नाही”, अशी भूमिका मोदी यांनी मांडली.

मुस्लिमांचं काय घेऊन बसलात? मला ५ मुलं आहेत! मल्लिकार्जुन खरगेंचं मोदींना प्रत्युत्तर

तसेच केंद्रात तिसऱ्यांदा सरकार आल्यानंतर मोठ्या स्तरावर प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापन दिन साजरा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. यातून भाजपाचे संविधानावर प्रेम आहे, असे त्यांना सुचवायचे होते. याबरोबरच पंतप्रधान मोदी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, तेलंगणातून दुप्पट कर वसूल केला जात असून तो दिल्लीत (काँग्रेसकडे) पाठविला जात आहे.

तेलंगणातून काळा पैसा दिल्लीत जातोय

पंतप्रधान मोदी म्हणाले, “तेलगू चित्रपटसृष्टीने भारताला RRR सारखा सुपरहिट चित्रपट दिला. पण आज तेलंगणा काँग्रेसने राज्यातील जनतेवर डबल ‘आर’ कर लादला आहे. ट्रिपल आर म्हणजेच RRR चित्रपटाने जगभरात भारताची मान उंचावली. मात्र दुप्पट आर करामुळे भारताची बदनामी होत आहे. या कराची तेलंगणात प्रत्येक ठिकाणी चर्चा होत आहे. तेलंगणाच्या व्यापारी, कंत्राटदारांना मागच्या दाराने कर द्यावा लागत आहे. तेलंगणातून जेवढी वसूली होते, त्यातील काही टक्के काळा पैसा दिल्लीत जात आहे. हा डबल आर कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे.”

आरक्षण रद्द करण्याच्या कथित व्हिडिओवर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर आरोप करत म्हणाले…

पंतप्रधान मोदी यांचा रोख तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (RR) यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते.