मुंबईत १ जानेवारीपासून ए.सी. लोकल धावणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिल्लीत केली. सुरूवातीच्या टप्प्यात लोकलचे एक किंवा दोन डबे वातानुकूलित असतील त्यानंतर हळूहळू  लोकलचे सगळे डबे ए.सी. केले जातील असेही गोयल यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील रेल्वे सुरक्षेवर आमचा भर असणार आहे त्यासाठी स्टेशन्सवर सीसीटीव्हींची संख्या वाढवण्यात येईल. हे सीसीटीव्ही  तेथील जवळच्या पोलीस स्थानकांशी जोडले जातील असेही गोयल यांनी म्हटले. त्याचप्रमाणे भारतीय रेल्वे अधिकाधिक सक्षम करण्यावर आमचा भर असेल असेही गोयल यांनी म्हटले. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रेल्वेचा कोणताही विभाग बंद केला जाणार नाही. तसेच प्रवाशांच्या दृष्टीने अनेक सुधारणा करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन रेल्वे स्टेशनवर देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा वाढविण्यात येतील. तसेच ट्रेन आणि स्टेशन्सवर सीसीटीव्हींची संख्या वाढवण्यात येणार आहे. देशभरातल्या ३ हजार रेल्वे स्टेशन्सवर स्वयंचलित जीने बसवण्यात येतील ज्याचा फायदा दिव्यांग आणि वृद्ध प्रवाशांना होईल असेही गोयल यांनी सांगितले. एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीची दुर्घटना झाल्यानंतर मुंबईतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर ज्या स्थानकांवर पादचारी पूल नाहीत किंवा ज्या ठिकाणी संख्या कमी आहे अशा स्थानकांवर तातडीने पूल बांधण्याचा निर्णय झाला. आता प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणखी काही निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आले.