जामीन मंजूर झाल्यावर एखादा आरोपी भूमिगत झाल्यास त्याला जामीन मिळण्यासाठी हमी देणाऱ्या व्यक्तीवर त्वरित कारवाई केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. गुन्हेगारांकडून न्यायव्यवस्थेला वेठीस धरण्याचे प्रकार वाढत चालले असून ही चिंताजनक बाब आहे, असे सदर आदेश देताना न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
जामीन मिळाल्यावर भूमिगत होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असताना न्यायालय मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ शकत नाही. त्यामुळे अशा प्रकरणात त्याची याचिका फेटाळून लावण्यासह अन्य कारवाईही केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
आरोपी अथवा त्याचा वकील न्यायालयात उपस्थित न राहण्याच्या प्रकारांना सातत्याने तोंड द्यावे लागते, त्यामुळे अशा वेळी आरोपीला हमी देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध त्वरित कारवाई झाल्यास आरोपीचा शोध घेऊन त्याला न्यायालयात सादर करणे शक्य होईल. त्यामुळेच अशा प्रकारचा निर्णय आवश्यक आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.