दोन दिवसांपू्र्वी दाक्षिणात्य अभिनेत्री आणि भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांनी केलेल्या एका धक्कादायक अनुभव कथनामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. खुशबू सुंदर यांनी त्यांच्या लहानपणीचा अनुभव सांगताना माझे वडील आठ वर्षांची असल्यापासून माझं लैंगिक शोषण करत होते, असा खुलासा केला आहे. त्यांच्या या विधानावरून समर्थनात आणि या अशा वृत्तीच्या विरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री खुशबू सुंदर यांनी एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाल्या होत्या खुशबू सुंदर?

खुशबू सुंदर यांनी बरखा दत्त यांच्या ‘मोजो स्टोरी’साठी दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या लहानपणीचा अनुभव सांगितला होता. “माझ्या आईला भयंकर कौटुंबिक हिंसेचा सामना करावा लागला. एका अशा पुरुषाशी तिने संसार केला, ज्याला अलं वाटायचं की त्याच्या पत्नीला मुलांना मारहाण करणं हा त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. जो त्याच्या एकुलत्या एक मुलीचं लैंगिक शोषण करायचा”, असं त्या म्हणाल्या होत्या.

वाचा सविस्तर – “८ वर्षांची असल्यापासून वडील माझं लैंगिक शोषण करत होते”, भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांनी सांगितला धक्कादायक अनुभव!

“मी आठ वर्षांची असल्यापासून माझे वडील माझं लैंगिक शोषण करत होते. जेव्हा मी १५ वर्षांची झाले, तेव्हा माझ्यामध्ये त्यांच्याविरोधात बोलण्याची हिंमत आली. कुटुंबातील इतर सदस्यांना त्रास सहन करावा लागू नये, म्हणून मी आठ वर्षं गप्प राहिले. मला एका गोष्टीची कायम भीती वाटत राहायची. ‘काहीही झालं तरी माझा पती म्हणजे परमेश्वर आहे’ अशा मानसिकतेची माझी आई माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. पण जेव्हा मी १५ वर्षांची झाले, मी वडिलांविरोधात बोलायला सुरुवात केली”, असंही त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

“गुन्हेगारांना लाज वाटली पाहिजे”

दरम्यान, आपल्या या खुलाशावर बोलताना खुशबू सुंदर यांनी गुन्हेगारांना या सगळ्या प्रकाराची लाज वाटली पाहिजे, असं म्हटलं आहे. “मी कोणतंही धक्कादायक विधान वगैरे केलेलं नाही. मी प्रामाणिकपणे जे घडलं ते सांगितलं. मी जे काही बोलले, त्याची मला अजिबात लाज वाटत नाही. ज्यांनी हे कृत्य केलं, त्यांना याची लाज वाटली पाहिजे. जर मी त्याबद्दल बोलायला इतकी वर्षं घेतली, तर माझं मत आहे की इतर महिलांनीही या अशा अन्यायांविरोधात बोलायला हवं”, असं खुशबू सुंदर म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress bjp leader khushbu sundar on sexual abused remarks pmw
First published on: 07-03-2023 at 14:26 IST