पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात देशभरातल्या अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली आहे. इंडिया आघाडीत सर्वकाही आलबेल असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी लवकरच जागावाटप होईल, असं सांगितलं जात होतं. अशातच इंडिया आघाडीतल्या दोन मोठ्या पक्षांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. पश्चिम बंगाल काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. अधीर रंजन चौधरी म्हणाले, ममता बॅनर्जी यांना ही इंडिया आघाडी नको आहे. त्या पंतप्रधान मोदींची सेवा करण्यात व्यस्त आहेत.

इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, पश्चिम बंगालध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला केवळ दोन जागा देण्याबाबत भाष्य केलं होतं. उर्वरित जागांवर तृणमूलचे उमेदवार उभे राहतील. काँग्रेसला केवळ दोन जागा देण्याबाबत बोलताना तृणमूलने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा दाखला दिला होता. २०१९ च्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला ४३ टक्के मतं मिळाली होती. त्याचबरोबर त्यांच्या पक्षाने राज्यात ४२ पैकी २२ जागा जिंकल्या होत्या. अशा परिस्थितीत तृणमूलला राज्यातील जागावाटपाचा अधिकार द्यावा, अशी मागणी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने केली आहे.

तृणमूलच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी म्हणाले, मला माहिती नाही ममता बॅनर्जींकडे कोणी दोन जागांची भीक मागितली. आम्ही तर त्यांच्याकडे अशी भीक मागितली नाही. ममता बॅनर्जी स्वतः म्हणतात त्यांना ही आघाडी हवी आहे. परंतु, आम्हाला त्यांची दया नको. आम्ही आमच्या ताकदीवर निवडणूक लढू.

अधीर रंजन चौधरी म्हणाले, खरंतर ममता बॅनर्जी यांना ही आघाडी नको आहे. त्या केवळ मोदींची सेवा करण्यात व्यस्त आहेत.

हे ही वाचा >> “…तर आम्हीही भाजपात सामील झालो असतो”, अटक होण्याच्या शक्यतेवर अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूत्रांनी सांगितलं आहे की, लोकसभेचे जागावाटप हे आधीची लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या आधारावर केलं जाईल. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये सर्व ४२ जागा लढवल्या होत्या. परंतु, त्यापैकी त्यांना केवळ दोनच जागा जिंकता आल्या. मालदा आणि बरहामपूर या दोन जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. देशातल्या सर्वात जुन्या पक्षाला या निवडणुकीत केवळ ५.६७ टक्के मतं मिळाली होती. काँग्रेसला सीपीआय (एम) पेक्षा कमी मतं मिळाली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सीपीआय (एम) पक्षाला ६.३३ टक्के मतं मिळाली होती.