गेल्या अनेक दिवसांपासून सुरू चर्चेत असलेला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार अखेर बुधवारी पार पडला. एकूण ४३ मंत्र्यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांची एकूण संख्या आता ७८ झाली आहे. मात्र, यापैकी तब्बल ४२ टक्के अर्थात ३३ मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल असून त्यातल्या २४ जणांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत. ADR अर्थात Association For Democratic Reforms ने नुकताच यासंदर्भातला अहवाल जाहीर केला असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार वरील निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.

निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली माहिती

असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) कडून अशा प्रकारचे अभ्यास अहवाल प्रकाशित केले जातात. एडीआरच्या ताज्या अहवालानुसार, एकूण ७८ केंद्रीय मंत्र्यांपैकी ३३ मंत्र्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. शिवाय, २४ मंत्र्यांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्नसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सर्वांनी निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या माहितीवरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

गृह राज्यमंत्र्यांविरोधातच हत्येचा गुन्हा!

दरम्यान, यंदाच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री ठरलेले ३५ वर्षीय निसित प्रामाणिक यांच्याकडे केंद्रीय गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या विरोधातच भादंविच्या कलम ३०२ नुसार हत्येचा गुन्हा दाखल असल्याचं एडीआरच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल निवडणुकांदरम्यान ज्या कूच बेहेरमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या, त्या मतदारसंघातून निसिथ प्रामाणिक खासदार म्हणून निवडून आले आहेत. याशिवाय, जॉन बारला, पंकज चौधरी आणि व्ही मुरलीधरन या तिघांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा (भादंवि ३०७) गुन्हा दाखल आहे.

९० टक्के मंत्री करोडपती!

दरम्यान, एडीआरच्या आहवालात केलेल्या दाव्यानुसार, ७८ मंत्र्यांपैकी ७० मंत्री म्हणजेच ९० टक्के मंत्री हे करोडपती आहेत. या मंत्र्यांची प्रत्येकी संपत्ती ही सरासरी १६.२४ कोटी रुपये इतकी आहे. केंद्रातल्या एकूण ४ मंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये ५० कोटींहून जास्त संपत्ती असल्याचं जाहीर केलं आहे. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे, पियुष गोयल, नारायण राणे आणि राजीव चंद्रशेखर यांचा समावेश आहे.

योगायोग! ज्योतिरादित्य शिंदे यांना मिळालं ३० वर्षांपूर्वी वडिलांनी सांभाळलेलं खातं

८ मंत्र्यांची संपत्ती १ कोटीहून कमी

एकूण ७८ केंद्रीय मंत्र्यांपैकी ८ मंत्र्यांची संपत्ती ही १ कोटीपेक्षा कमी असल्याचं एडीआरनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. यामध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांच्यानावे फक्त ६ लाखांची संपत्ती आहे. जॉन बारला यांच्या नावे १४ लाख तर कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्यानावे २४ लाखांची संपत्ती आहे.

शपथ घेताच ज्योतीरादित्य शिंदेंच्या फेसबुकला अकाऊंटला शेअर झाला मोदी सरकारवरील टीकेचा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

८२ टक्के मंत्री सुशिक्षित

या अहवालानुसार, केंद्रीय मंत्रिमंडळापैकी एकूण ८२ टक्के म्हणजेच ६४ मंत्री हे सुशक्षित आहेत. यांचं शिक्षण पदवी किंवा त्यापेक्षा जास्त आहे. त्याशिवाय, १५ टक्के म्हणजेत १२ मंत्री ही ८वी ते १२वीदरम्यान शिक्षण घेतलेले आहेत. एकूण दोन मंत्र्यांनी डिप्लोमा केला आहे. तर १७ मंत्री पदवी, २१ मंत्री पदव्युत्तर तर ९ मंत्री डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलेले आहेत.